लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस महासंचालक पदावरून हटविण्यात आलेल्या रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शुक्ला यांचे भवितव्य नव्या सरकारच्या हातात राहणार आहे.
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास शुक्ला यांची पुन्हा महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस दलाच्या वाहनांमधून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना रसद पुरविली जात असल्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आरोप, पक्षपातीपणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार, संगमनेरसह विविध भागांमधील राजकीय संघर्ष हाताळण्यावरून पोलिसांच्या भूमिकेवरून निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आणि आयोगाच्या निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तात्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा >>>Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
शुक्ला यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तसेच आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाला पाठविली होती. त्यातून आयोगाने किमान दोन वर्षांचा कार्यकाळ मिळू शकेल, या निकषाची पूर्तता करणाऱ्या संजय कुमार वर्मा यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने मंगळवारी वर्मा यांची विधानसभा निवडणूक पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?
मंत्रालयात चर्चा
● राज्य सरकारने शुल्का यांना दोन वर्षांसाठी महासंचालकपदी नियुक्त केले होते. मात्र आयोगाच्या आदेशानुसार आता त्यांना पदावरून हटविण्यात आल्यामुळे शुक्ला यांचे भवितव्य काय, अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे. शुल्का यांच्या भवितव्याचा निर्णय नवीन सरकारच घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
● नियमानुसार महासंचालकपदी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करताना ३० वर्षे सेवा झालेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून आयोग तीन अधिकाऱ्यांची नावे राज्य सरकारला पाठविते आणि त्यातून सरकार एका अधिकाऱ्यांची महासंचालकपदी नियुक्ती करते.
● वर्मा यांना निवडणूक काळापुरते नियुक्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्ला यांची नियुक्ती सरकारने केली असल्याने आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेईल. विद्यामान सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शुक्ला यांना पुन्हा महासंचालकपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते असेही सूत्रांनी सांगितले.