विजयादशमीनिमित्त नागपूर येथील रेशीमबागमध्ये आयोजित समारंभात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले. याच समारंभात अमर कुलकर्णी यांनी ‘शून्य से एक शतक बनते, अंक की मनभावना…’ हे एकल गीत गायले. या गीतामुळे संघासाठी असणाऱ्या या वर्षाचे महत्त्व अधोरेखित झाले. संघासाठी विजयादशमी आणि हे वर्ष महत्त्वाचे का आहे, हे गीत काय सुचवते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
रेशीमबाग येथे विजयादशमीनिमित्त आयोजित समारंभात अमर कुलकर्णी यांनी ‘शून्य से एक शतक बनते, अंक की मनभावना…’ हे गीत गायले. काही महिन्यांपूर्वी या गीताची रचना करण्यात आली होती. वरिष्ठ नेत्यांकडून गीताविषयीचे अभिप्रायही जाणून घेण्यात आले आणि गाण्याचा सरावही करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशी या गाण्याचे सर्वांसमोर अनावरण करण्यात आले. या गाण्यामध्ये श्रीरामांना वंदन करण्यात आले आहे, तसेच हे गाणे अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पणाचे प्रतीक ठरेल.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत श्रोत्यांना संबोधित करण्याआधी कुलकर्णी यांनी एकल गायन केले. रा. स्व. संघाला २०२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. विजयादशमीच्या दिवशी १९२५ रोजी नागपूर येथे आरएसएसची स्थापना झाली होती. १९२५ पासून शतकपूर्तीपर्यंतचा प्रवास या गाण्यामधून प्रतिबिंबित होतो.
रा. स्व. संघामध्ये तीन प्रकारची गाणी म्हटली जातात. पहिली म्हणजे प्रार्थना. केवळ स्वयंसेवक असतील, तर ती कार्यक्रमाच्या शेवटी म्हटली जाते आणि कार्यक्रमात अन्य लोकांचा समावेश असेल, तर ती कार्यक्रमाच्या प्रारंभी म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे गण गीत. गण गीत हे समूहाने गायले जाते. त्यामध्ये गीताची एक ओळ एक स्वयंसेवक म्हणतो आणि अन्य स्वयंसेवक त्याची पुनरावृत्ती करतातात. तिसरे गीत म्हणजे एकल गीत. एक स्वयंसेवक हे गीत म्हणतो. त्यामध्ये विशेषत्वाने प्रार्थना असतात किंवा संस्कृत, हिंदी व प्रादेशिक भाषांमधील गीते असतात.
रा. स्व. संघाची एकल गीते ही भारतमातेप्रति आदर, मातृभूमीवरील प्रेम व वचनबद्धता, स्तुतिपर असतात. भारताचा इतिहास, संस्कृती, वैशिष्ट्ये यांचे वर्णन या गीतांमध्ये असते. गण गीते मुख्यतः एकतेचे आणि संघटित होण्याचे महत्त्व सांगणारी असतात. दरवर्षी एक नवीन गणगीत रचले जाते आणि ते देशभरातील आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये वर्षभर गायले जाते. राज्य स्तरावर प्रादेशिक भाषांमध्ये गीते लिहिण्यास सांगितले जाते.
सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितल्यानुसार, हे आता लिहिलेले नवीन एकल गीत रा. स्व. संघाच्या शतकपूर्तीला वाहिलेले आहे. या एकल गीतामधील चार कडव्यांपैकी तीन कडवी पश्चिम उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्याच्या बौद्धिक प्रमुखांनी लिहिली आहेत. “मी हे गाणे जूनमध्ये लिहिले होते. संघाने सुचविलेल्या काही दुरुस्त्यांनंतर ते अंतिम करण्यात आले,” असे ते म्हणाले. नाव प्रसिद्ध न करता, त्यांनी संघासाठी आजवर अनेक गाणी लिहिली आहेत.
अमर कुलकर्णी यांनी हे गीत गायले असून, ते रा. स्व. संघाशी संलग्न असणाऱ्या संस्कार भारतीसह काम करतात. या गीतरचनेत सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकाने गुरुवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “प्रथम हे गीत जेव्हा सरसंघचालक डॉ. भागवत यांच्यासमोर सादर करण्यात आले, तेव्हा त्यांना ते अपूर्ण वाटले. म्हणून चौथे कडवे जोडण्यात आले.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौथे कडवे नागपूर येथील एका स्वयंसेवकाने लिहिले आहे.
गाण्याचा अर्थ…
आरएसएसच्या शतकापूर्तीनिमित्त सादर करण्यात आलेल्या या गाण्यात संघाचा १०० वर्षांचा प्रवास आहे. गाण्याची सुरुवात ‘शून्य से एक शतक बनते, अंक की मनभावना, भारती की जय विजय हो, ले हृदय में प्रेरणा…’ (शून्यापासून शंभरीकडे जाण्याचे स्वप्न मनात प्रेरणा घेऊन पूर्ण होईल, मातृभूमीचा विजय होईल) या गीतामध्ये श्रीरामांची स्तुती केलेली आहे. “दैव ने भी राम प्रभु हित लक्ष्य था ऐसा विचार, कंटकों के मार्ग चालकर राम ने रावण संहारा (देवाने रामाला एक ध्येय दिले होते, रावणाला मारण्यासाठी प्रभू राम काट्यांवर चालले (श्रीरामांनी संकटे सहन केली)).”
त्याच्या दुसऱ्या कडव्यात रा. स्व. संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांच्या मेहनतीचा आणि त्यागाचा उल्लेख त्यांचे नाव न घेता केलेला आहे. चौथ्या कडव्यात भारताची संस्कृती, वातावरण आणि जे उपेक्षित होते, त्यांच्या उन्नतीच्या संकल्पाची प्रशंसा केलेली आहे.
तिसरे कडवे नंतर जोडले गेले. “विजिगीषा का भाव लेकर, देश में स्वतंत्रता आया, बने समरस राष्ट्र, भारत बोध यह दायित्व लाया, चल कपट और भेद से था राष्ट्र जन को तरना (स्वातंत्र्य हे जिंकण्याच्या भावनेनेच विजयी झाले, सुसंवाद प्रस्थापित करण्याची आणि देशाला दहशत आणि पक्षपातीपणापासून मुक्त करण्याची जबाबदारी आहे.)
सूत्रांनी सांगितल्यानुसार, हे नवीन गाणे काही महिन्यांपासून रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांसमोर सादर करण्यात येत होते. त्यांनी केलेल्या सूचनांनुसार त्यात बदल करून, अंतिमत: विजयादशमीला ते सर्वांसमोर सादर करण्यात आले.