Raver Assembly Election 2024: जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघ वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी तर, त्यांच्या विरोधात भाजपचे दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजपने रावेरमध्ये प्रथमच चौधरी आणि जावळे परिवाराच्या युवा राजकीय वारसदारांना संधी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमोल जावळे यांनी लोकसभा निवडणुकीत रावेरमधून उमेदवारी मागितली होती. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठींनी विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन त्यांची त्यावेळी समजूत घातली होती. ठरल्यानुसार अमोल जावळेंना भाजपने रावेरमधून विधानसभेसाठी उमेदवारी दिली असून, ते वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहेत. अमोल हे भाजपच्या पूर्व भागाचे म्हणजेच रावेर लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा रावेर मतदारसंघात जनसंपर्क आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे वडील हरिभाऊ जावळे यांना रावेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा >>>तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांची खासदार धानोरकर यांच्यावर मात

रावेरची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी स्वतःसाठी उमेदवारी न मागता पुत्र धनंजय चौधरी यांना पुढे आणले आहे. काँग्रेसनेही धनंजय यांना रावेरची उमेदवारी जाहीर केल्याने चौधरी परिवाराची चौथी पिढी यंदा रावेरच्या राजकारणात सक्रिय झाली आहे. परंतु, धनंजय यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे जुने निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे रावेर येथील माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी चौधरी परिवारावर घराणेशाहीचा आरोप केला असून, अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे चौधरी परिवारापुढे दारा यांना थोपविण्याचे आव्हान आहे.

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनिल चौधरी रिंगणात आहेत. चौधरी यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. चुरशीच्या लढतीत त्यांना सुमारे ४४ हजार ८४१ मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीकडून शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शमिभा या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raver vidhan sabha constituency fight between shirish chaudhary vs haribhau jawle for maharashtra vidhan sabha election 2024 print politics news amy