अमरावती : राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या समर्थकांचा भ्रमनिरास झालेला असताना भाजप पक्षश्रेष्ठींनी राणा दाम्पत्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पेटून उठलेल्या राणा दाम्पत्याने विधानसभा निवडणुकीच्या काळात घेतलेली सूड उगवण्याची आक्रमक भूमिका, भाजपच्या स्थानिक वर्तुळाला दूर लोटण्याचा प्रयत्न यातून राणा यांना यश प्राप्त झाले असले, तरी राणा यांच्या स्वतंत्र राजकारणाच्या मर्यादा देखील स्पष्ट झाल्या आहेत.
े
रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक रिंगणात होते. भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटच्या वर्तुळातील मानले जातात. स्थानिक राजकारणात त्यांना भाजपच्या नेत्यांपेक्षा आजवर झुकते माप देण्यात आले. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाने अनेकदा स्थानिकांची नाराजी देखील ओढवून घेतली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी, भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली. जिल्ह्यात भाजपचे कधी नव्हे, इतके पाच आमदार निवडून आले. रवी राणा हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे यावेळी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ नक्कीच पडणार, अशी आशा त्यांचे समर्थक बाळगून होते. पण त्यांची निराशा झाली.
राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्यातील महायुतीच्या दोन उमेदवारांविरुद्ध उघड भूमिका घेतली होती. त्यापैकी दर्यापुरातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजीत अडसूळ हे पराभूत झाले. पण अमरावतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके या निवडून आल्या. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर एक हाती वर्चस्व मिळवण्याची राणा यांची इच्छा फलद्रुप झाली नाही. राणा यांच्या विरोधकांची संख्या देखील वाढली आहे. अशा स्थितीत राणा यांना मंत्रिपद देणे, भविष्यातील राजकारणासाठी गैरसोयीचे ठरेल, या भावनेतून त्यांना यावेळी मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा – रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी
घटक पक्षांच्या मर्यादा
महायुतीत अनेक घटक पक्ष आहेत. स्थानिक राजकारणात त्यांचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. महायुतीचे घटक असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. पण विनय कोरे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. रवी राणा यांना मंत्रिपदाची संधी दिल्यास इतर घटक पक्षांची नाराजी देखील समोर येऊ शकते. त्यामुळे यावेळी त्यांचे मंत्रिपद हुकल्याची चर्चा आहे.