कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ निभावलेले, फर्डे वक्ते रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. स्वाभिमानीमध्ये आणखी एक फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी व रविकांत तुपकर या दोघांनीही शिवारातून संसदेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र मतदारांनी त्यांना शिवारातच ठेवणे पसंत केले आहे. पराभवातून काही शिकण्याऐवजी एकमेकांशी संघर्ष वाढवून घेण्यात त्यांनी धन्यता मानल्याचे दिसत आहे. वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी उभयतांचे राजकीय भवितव्य कसे यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तरुण नेतृत्वाची जडणघडण झाली . त्यातील एक ठळक नाव म्हणजे राजू शेट्टी. पुढे शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा शिरोळ तालुक्यात रोवला. या माध्यमातून ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार, दोन वेळा खासदार असा प्रवास करीत राहिले. याकाळात त्यांना अनेक ताज्या दमाच्या शेतकरी नेतृत्वाची साथ मिळाली. त्यातील अनेकांशी पुढे मतभेद होत गेले. माजी कृषी राज्यमंत्री, रयत क्रांती संघटनेचे नेते, आमदार सदाभाऊ खोत, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील,आमदार देवेंद्र भुयार यांच्यापासून डझनभर प्रमुखांनी शेट्टी यांच्यापासून दूर जाणे पसंत केले. याच मालेत तुपकर यांचेही नाव पाच वर्षापूर्वी जोडले गेले होते. मात्र ते पुन्हा स्वाभिमानीच्या छावणीत परतले तेच मुळी शेट्टी यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा आणाभाका घेवून. हे वचन तीन वर्षांपर्यंतच टिकले.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच शेट्टी – तुपकर यांच्यातील वाद चिघळत चालला होता. शेट्टी विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते; तेव्हा तुपकर आंदोलनात होते. त्या आंदोलनात शेट्टी यांनी सहभागी होण्याचे आवाहन तुपकर यांनी केले होते. शेट्टी यांनी त्याकडे कानाडोळा केला. अशातच शेट्टी यांनी तुपकर यांच्या बरोबरीने स्वाभिमानीत काम करू लागलेले प्रशांत डिक्कर यांना ताकद दिली. त्यातून दुहीची बीजे आणखी रोवली गेली. लोकसभा निवडणुकीला तुपकर यांना स्वाभिमानीचे उमेदवारी नाकारण्यात आली. हातकणंगले शेट्टी तर बुलढाणा येथून तुपकर यांनी स्वबळावर नशीब आजमावले खरे पण दोघांनाही पराभूत व्हावे लागले. दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टी यांच्या पेक्षा तुपकर यांना अधिक मते मिळाली होती. साहजिकच तुपकर यांच्या समर्थकांनी आपली ताकत शेट्टींपेक्षा अधिक असल्याचा दावा समाज माध्यमातून चालवला होता. त्यातून या दोघांतील मतभेद आणखी टोकाला गेले.
हेही वाचा…चावडी : एवढा बदल कसा?
परिणामी काल पुणे येथे झालेल्या स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकर यांना स्वाभिमानीतून बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचे घोषित केले. आता शेट्टी हे राज्यात शेतकरी नेते अन्य काही संघटना यांना सोबत घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. तुपकर यांनी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.’ माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो, ‘ असे ट्वीट करीत त्यांनी शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राजू शेट्टी माझ्याशी इतके वाईट वागतील असे वाटत नव्हते. माझा काय गुन्हा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचा पवित्रा पाहता आता सदाभाऊ खोत यांच्यानंतर रविकांत तुपकर हेही राजू शेट्टी यांचा मार्ग आणखी काटेरी करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.