रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल

आघाडी सोबत चर्चा सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील तुपकर यांनी व्यक्त केली.

ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana
रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल (Photo Credit – Ravikant Tupkar/X)

बुलढाणा: राज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी रविकांत तुपकर यांनी बिगर राजकीय सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटना या संघटनेची रीतसर घोषणाच त्यांनी केली. चळवळीचे अस्तित्व कायम ठेवून महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला. आघाडी सोबत चर्चा सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा देखील तुपकर यांनी व्यक्त केली.

मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे झालेल्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बुलढाणा चिखली राज्य महामार्गावरील गोलांडे लॉन्स येथे ही राज्यस्तरीय बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २२ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. बुलडाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक पार पडली. या तातडीच्या बैठकीत रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका जाहीर करतात या याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी मोठा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांना बाजूला केल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी आपली वेगळी अशी स्वतंत्र संघटना असावी, अशी मागणी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती. त्याला अनुसरुन रविकांत तुपकरांनी सर्वांशी चर्चा केली. चर्चेअंती स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणा आज बुलढाण्यात झालेल्या बैठकीत केली.

हेही वाचा : हरियाणा इम्पॅक्ट, आरक्षण की लोकप्रिय घोषणा; महाराष्ट्र विधानसभेत कोणते मुद्दे प्रभावी ठरणार?

प्रसंगी पक्ष चिन्हावर…

यावेळी रविकांत तुपकर यांनी मुख्य मार्गदर्शन केले. क्रांतिकारी शेतकरी संघटना आता राज्यभर अधिक व्यापक पद्धतीने काम करणार आहे. ही संघटना केवळ शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित राहणार नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी ही संघटना काम करणार आहे. बिगर राजकीय सामाजिक संघटना म्हणून ही संघटना राज्यभरात आक्रमकपणे काम करेल, असे प्रतिपादन तुपकर यांनी यावेळी केले.

पुढे ते म्हणाले की, सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आपल्यासमोर सध्या ४ पर्याय आहे. पहिला पर्याय महाविकास आघाडी, दुसरा महायुती, तिसरा वंचित बहुजन आघाडी आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे. त्यावर काय करायचे..? तुमच्या मनात काय आहे, असे विचारताच महाविकास आघाडीसोबत जाण्यास प्राधान्य द्यावे, जर ते सकारात्मक झाले नाही तर सर्व पर्याय आपल्यासमोर खुले आहेत, असे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान आपली महाविकास आघाडी सोबत सकारात्मक चर्चा सुरू असून महाविकास आघाडी कडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असा आशावाद तुपकरांनी बोलून दाखविला.

हेही वाचा : Navya Haridas: प्रियांका गांधींना वायनाडमध्ये तगडं आव्हान; RSS ची पार्श्वभूमी असलेली नव्या हरिदास केरळमध्ये कमळ फुलविणार?

क्रांतिकारी शेतकरी संघटना” म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, निवडणूक कोणत्या ‘सिम्बॉल’वर लढवायची हे ठरवू . या संदर्भात आपली १० जणांची ‘कोअर कमिटी’ निर्णय घेईल. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय होणार आहे. त्यामुळे ताकदीने कामाला लागा, असा सूचक इशाराही तुपकर यांनी कार्यकर्त्यांना दिला. दोन दिवसात अधिकृतपणे निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने तयार रहा असेही तुपकरांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravikant tupkar s krantikari shetkari sanghatana alliance with mahavikas aghadi print politics news css

First published on: 22-10-2024 at 18:25 IST
Show comments