डोंबिवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे तारांकित प्रचारक म्हणून भाजप नेतृत्वाच्या इशाऱ्यावर सर्व प्रकारची कामगिरी चोखपणे पार पाडणारे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना यावेळच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने डोंबिवली-कल्याणसह कोकण, पालघर पट्ट्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील तीस वर्षांच्या राजकीय कार्यकाळात प्रत्येक वेळी मुंबई शहराच्या उंबरठ्यावरील सुशिक्षित, मध्यमवर्गीयांचे शहर म्हणून डोंबिवली शहराला सत्ताधारी पक्षाने मंत्रीपदाची संधी दिली. यापूर्वी भाजपचे राम कापसे, काँग्रेसचे नकुल पाटील, भाजपचे जगन्नाथ पाटील यांनी या शहराचे नेतृत्व केले. मागील तीन वर्षांच्या कालावधीत रवींद्र चव्हाण यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागाची मंत्रीपदे भूषवली.

हेही वाचा >>>मंत्र्यांची ओळख : चंद्रशेखर बावनकुळे, इंद्रनील नाईक, ॲड. आशिष जयस्वाल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांना गनिमी काव्याने सुप्तपणे सुरतला नेण्याची जबाबदारी भाजप पक्षनेतृत्वाच्या इशाऱ्यावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी चोखपणे पार पाडली होती. तेव्हापासून महायुतीसह भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून चव्हाण ओळखले जातात. लोकसभेसह नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणपट्टीतील भाजपसह महायुतीचे ३४ आमदार निवडून आणण्यात चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता. ही मोहीम कोणताही गाजावाजा न करता, सुप्तपणे पार पाडल्याने भाजपच्या दिल्लीसह राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला होता.

विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सुरू असलेल्या चर्चांमध्ये मराठा चेहरा म्हणून मुख्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांचे काही दिवस चर्चेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासातील म्हणून ते ओळखले जातात. शनिवारपासून त्यांचे नाव मंत्र्यांच्या यादीतून गायब झाल्याने समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>>Eknath Shinde : शिंदे यांची तारेवरची कसरत

रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले नसले तरी भाजप नेतृत्व त्यांच्यावर अन्य काही मोठी जबाबदारी टाकण्याचा विचार करत असावे. त्यामुळे यामध्ये नाराजी विषय येत नाही.- नरेंद्र सूर्यवंशीजिल्हाध्यक्ष, भाजप कल्याण जिल्हा.

मोठ्या संख्येने आमदार निवडून आणले म्हणून यावेळी रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळेल असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते. ते पद मिळाले नाही म्हणून भाजप कार्यकर्ते नाराज होणे साहजिक आहे. पक्ष त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी देण्याचा विचार करत असावे.- शशिकांत कांबळेप्रदेश नेते, भाजप.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra chavan supporters are upset because they did not get the ministerial post print poltics news amy