मुंबई : चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश होऊन महत्वाचे महसूल खाते देण्यात आले असले तरी त्यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही तूर्तास कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी ’ लोकसत्ता ’ ला सांगितले. यामुळे मंत्रिमंडळात संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड काही काळ तरी लांबणीवर पडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडेही सध्या मुंबई भाजपचे अध्यक्षपद असून बावनकुळे आणि शेलार यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत पक्षातील जबाबदाऱ्या कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे प्रदेश महाअधिवेशन येत्या रविवारी (१२ जानेवारी) शिर्डी येथे होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा त्यात मार्गदर्शन करणार आहेत.

हे ही वाचा… ‘आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न’, दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघातील मतदार भाजपाला दूर ठेवणार?

भाजपमध्ये ‘ एक व्यक्ती, एक पद ’ हे जुने सूत्र असले तरी सध्या त्याचे पालन सोयीनुसार केले जाते. त्यामुळे जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून समावेश होऊन सात महिने उलटले, तरी त्यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद ठेवण्यात आले आहे. नवीन अध्यक्षांच्या निवडीस अजूनही काही महिने लागतील. बावनकुळे व शेलार यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. या दोघांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता त्यांच्याकडे ही जबाबदारी सध्यातरी कायम ठेवावी, असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची संघटना बांधणी, कार्यकर्त्यांना बळ देणे आणि रा.स्व. संघ व महायुतीतील समन्वय आदी दृष्टीने चांगले काम झाले आणि महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास संघटनात्मक घडी विस्कटली जावू नये, अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार, असे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यांच्यापैकी एका नेत्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र चव्हाण यांच्याकडे केवळ संघटन पर्व प्रभारीपदाची जबाबदारी सोपवून पक्षाचे सदस्य वाढविण्याचे काम देण्यात आले आहे. सध्या पक्षात तालुका व जिल्हा पातळीवर संघटनात्मक निवडणुका घेण्याचे नियोजन असून त्यानंतर मुंबई व प्रदेशाध्यक्षपदाची निवड अपेक्षित आहे. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या, तर शेलार व बावनकुळे यांच्याकडे पक्षातील जबाबदाऱ्याही ठेवल्या जातील आणि निवडणुका वर्षअखेरीस होणार असतील, तर मात्र त्यांच्याजागी नवीन नेत्यांची निवड होईल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले.

हे ही वाचा… Congress : २४, अकबर रोड; हा काँग्रेसचा पत्ता सुमारे पाच दशकांनी बदलणार, १५ जानेवारीला नव्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल

शिर्डी येथील अधिवेशनात पाच-सहा हजाराहून अधिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचे बिगुल वाजविण्यात येणार आहे. भाजप काही महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करीत असून मुंबईत मात्र महायुतीने लढण्याची शक्यता आहे. युतीबाबतचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड यश मिळाल्याने त्यांचा सत्कार आणि अभिनंदनाचा ठराव करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra chavan will have to wait for the responsibility of the bjp state president post print politics news asj