पुणे : पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केल्याने पुण्यातील काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात गेल्यासारखी झाली आहे. धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धंगेकर हे स्वगृही परतणार आहेत. पुण्यात शिंदे गटाची ताकद ही क्षीण असल्याने धंगेकरांच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच पक्षाला पाय रोवण्याची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये धंगेकर यांना कसब्यातून पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पराभवात काँग्रेसचाच हात असल्याची त्यांची भावना झाली. या मतदार संघात माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. स्थानिक नेत्यांचा असहकार पाहून त्यांनी स्वत:ची प्रचारयंत्रणा कामाला लावली होती. तेव्हापासून धंगेकर हे नाराज होते. त्यांनी अखेर शिवसेना शिंदे पक्षात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.
पुण्यातील काँग्रेस ही गटातटाच्या राजकारणात अडकलेली आहे. धंगेकर यांची वाढती लोकप्रतिमा ही काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना त्रासदायक वाटत होती. धंगेकर हे भविष्यात पक्षावर कब्जा करतील, या भीतीपोटी पक्षाच्या कामकाजापासून त्यांना दूर ठेवण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. धंगेकर हे बाहेरील पक्षातून येऊनही त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाल्याने काही नेत्यांच्या मनात खदखद होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांनी धंगेकरांना एकाकी पाडले होते. निवडणुकीनंतर मात्र धंगेकर हे काँग्रेस पक्षाच्या कारभारापासून दूर होते. ते कोणत्याही आंदोलन किंवा पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात नव्हते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. धंगेकर यांनी मात्र पक्ष सोडण्याची घोषणा करताना काँग्रेसबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
धंगेकर यांच्यामुळे निद्रिस्त अवस्थेत असलेल्या काँग्रेसला गेल्या दोन वर्षांत उर्जितावस्था आली होती. पोटनिवडणुकीत कसब्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांना हुरुप वाढला होता. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीत आले. धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना चांगलीत लढत दिली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर धंगेकर हे काँग्रेसपासून अलिप्त असल्यासारखे होते. आता त्यांनी काग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसची स्थिती बुडत्याचा पाय आणखी खोलात जाण्यासारखी झाली आहे. सध्या पुण्यातील काँग्रेसकडे जनाधार असलेला चेहराच नसल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे प्रश्न निर्माण होणार आहे.
पुन्हा शिवसेना
धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेतून झाली. १९९७ ते २००६ या काळात ते शिवसेनेत होते. शिवसेनेचे माजी आमदार दीपक पायगुडे यांचे विश्वासू साथीदार म्हणून त्यांची ओळख होती. मनसेची स्थापना झाल्यानंतर धंगेकर हे राज ठाकरे यांच्यासोबत गेले. २००६ ते २०१७ या या काळात ते मनसेमध्ये होते. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. मागील महापालिकेची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढविली. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते स्वगृही परतले आहेत.
धंगेकरांकडे कोणती जबाबदारी?
पुण्यात शिवसेना शिंदे पक्षाची फारसी ताकद नाही. गेल्या महिन्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शहराध्यक्ष नाना भानगिरे हे एकमेव माजी नगरसेवक सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. धंगेकर यांच्या माध्यमातून शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे. आता धंगेकर यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. धंगेकर यांनी कोणतेही पद नको, असे स्पष्ट केले असले, तरी आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी धंगेकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.