पुणे : सारसबागेत नमाज पठण केल्याबद्दल काही जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पुणे शहरात या घटनेच्या अनुषंगाने मोठी चर्चा होत आहे. गेले काही दिवस समाजमाध्यमातून सारसबाग चर्चेत आलीच होती. त्याला धार्मिकतेची किनार होती. त्याबाबत विविध प्रकारचे संदेश समाज माध्यमांवर फिरले. त्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आल्याने पुन्हा एकदा या विषयाचे पडसाद उमटत असून, त्यातील सामाजिक-राजकीय कंगोऱ्यांचीही चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सारसबागेत नमाज पठण केल्याप्रकरणी नुकताच पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ५ मे २०२२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहरातील प्रसिद्ध तळ्यातल्या गणपतीचे मंदिर सारसबागेत आहे. मंदिराचे कामकाज श्री देवदेवेश्वर संस्थानातर्फे चालते, तर सारसबाग उद्यान परिसर महापालिकेच्या ताब्यात आहे. ‘गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडजवळील हिरवळीवर एकत्र येऊन नमाज पठण केले गेले. महापालिकेच्या मुख्य अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा जमाव जमवून गैरकृत्य केले. इतर समाजांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला,’ असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> पूजा खेडकर यांची अनेक विभागांतील प्रशिक्षणाला दांडी, प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणी गैरवर्तन केल्याचे विभागप्रमुखांचे अहवाल

सारसबागेसंदर्भात समाजमाध्यमातून फिरणाऱ्या संदेशांमध्ये ज्या घटनेवरून आत्ता गुन्हा दाखल झाला आहे, त्या चित्रफितीचाही समावेश होता, असे म्हटले जाते. या संदेशानंतर मध्यंतरी सारसबागेत शिववंदना कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यावरही बरीच उलटसुलट चर्चा समाजमाध्यमावरून झाली. भाजप नेते सुनील देवधर यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टनुसार, यात सहभागी एका कार्यकर्त्याला पोलिसांनी नोटीस दिली होती. देवधर यांनी या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहण्याचे जाहीर आवाहन त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून केले होते. देवधर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला. ‘या कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल, तर तो रद्द व्हायला हवा,’ असेही ते म्हणाले.

दरम्यान, समाजमाध्यमातून विशिष्ट समाजाला लक्ष्य करून फिरणाऱ्या संदेशांमध्ये फारसे तथ्य नसल्याचीही चर्चा आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहराने कायमच सलोखा आणि सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्याला बाधा पोहोचवणारे वर्तन कोणीच करू नये, अशी अपेक्षाही या चर्चांमध्ये व्यक्त होत आहे. ‘नागरिकांचे आचरण राज्यघटना आणि कायद्यानुसारच असावे. पुण्याच्या लौकिकाला बाधा येईल, असे वर्तन कोणीच करू नये,’ अशी भूमिका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मांडली. ‘पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, देवस्थान, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाजांतील नागरिक यांची एकत्रित बैठक घेऊ आणि असे काही घडले असेल, तर पुढील काळात असे घडणार नाही, यासाठीचे नियोजन करू, अशी विनंती मी पोलीस आयुक्तांना केली असून, अशी बैठक लवकरच होईल,’ असे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“तुमचा पिस्तूल परवाना रद्द का करू नये?”, IAS पूजा खेडकरांच्या 

निवडणूक प्रचारातील भाषणाचीही आठवण

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठीची जाहीर सभा सारसबागेसमोरील चौकात झाली होती. ‘काँग्रेसला मतदान करा, असे फतवे मुस्लीम मोहल्ल्यांतून निघत आहेत. सुज्ञ मुसलमान याच्या वाट्याला जाणार नाहीत. कारण काय राजकारण चालू आहे, ते त्यांना समजते. पण, काही जे वाह्यात आहेत, ज्यांना धुमाकूळ घालायचा आहे, ते काँग्रेसच्या माध्यमातून डोके वर काढायचा प्रयत्न करताहेत म्हणून असे फतवे निघताहेत,’ असे ठाकरे यांनी त्या वेळी झालेल्या सभेत म्हटले होते. सारसबाग प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेत या भाषणाचीही आठवण निघत आहे.