मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाची धार वाढवल्यानंतर या आरक्षणाला विरोधही होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या विरोधाचे नेतृत्व केले आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास्थळावरून काही अंतरावर भुजबळ यांनी एल्गार सभा घेतली. मराठा समाजाला जशास तसे उत्तर देण्याचे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले. छगन भुजबळ यांच्या आक्रमकतेमागील नेमकी भूमिका काय? याबाबत द इंडियन एक्स्प्रेसचे प्रतिनिधी आलोक देशपांडे यांनी भुजबळ यांची सविस्तर मुलाखत घेत, त्यांच्याशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न : निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ मनोज जरांगे-पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना, तुम्ही त्यांचा प्रखर विरोध करण्याचे कारण काय?

भुजबळ : मी मंडल आयोगाला पाठिंबा दिलेला होता आणि मागच्या ३५ वर्षांपासून माझी भूमिका बदललेली नाही. काँग्रेसशी आघाडी असल्याच्या काळापासून मी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपा यांच्यासह सर्वच पक्षांची अशाच प्रकारची मागणी आहे. जरांगे-पाटील यांना संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार ते आरक्षण मागत आहेत. पण, हे सर्व करताना त्यांनी मला विनाकारण लक्ष्य केले आणि चुकीच्या भाषेचा वापर केला. मी तरीही शांत राहिलो. मात्र, आता आरक्षणाची मागणी करणाऱ्यांकडून आमदारांच्या घरावर हल्ले होत आहेत, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे. हे हल्ले पूर्वनियोजित असून, अशा हिंसाचारात मृत्यू होण्याची भीती आहे.

हे वाचा >> “एखादा कलेक्टर कांबळे असला तर त्याच्या हाताखाली मराठा समाजाने…”, छगन भुजबळांचं जरांगेंना प्रत्युत्तर

छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानणारे हे तेच लोक आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे महात्मा फुले होते, शिवरायांवर पहिला पोवाडा महात्मा फुले यांनीच लिहिला होता. आता हे लोक आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकविणार? अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज केल्यानंतर पोलिसांवर कारवाई झाली, त्यामुळे पोलिस आता शांत आहेत. त्यामुळे याविरोधात मीच आवाज उचलण्याचा निर्णय घेतला. कुणीतरी याबाबत बोलले पाहिजे.

प्रश्न : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास राज्य सरकारला अपयश आले का?

भुजबळ : जालन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागील खरे कारण समोर यायला हवे होते. ज्या आमदारांच्या घरावर जमावाने हल्ला केला, त्यांची वरिष्ठ नेत्यांनी भेट घ्यायला हवी होती. पोलिसांच्या बाजूने कुणीच का बोलले नाही, याची मला कल्पना नाही. तुम्हीच त्यांना विचारा, मी आता स्वतःला रोखू शकत नाही, म्हणूनच मी याबद्दल आता बोलतोय. अनेक आमदारांना, अगदी उपमुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) यांनाही अपमानास्पद मेसेज पाठविण्यात आले. या दहशतीविरोधात कुणी तरी बोलायला हवे होते, त्यामुळे मी बोलायचा निर्णय घेतला.

प्रश्न : मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही हा विषय मांडला का?

भुजबळ : फक्त मंत्रिमंडळाची बैठकच नाही तर मी सर्वपक्षीय बैठकीतही आवाज उचलला होता. पोलिस भूमिका न घेता निष्क्रिय का आहेत? असा प्रश्न विचारला. पण, कुणीही उत्तर दिले नाही? मला माहीत नाही असे का? पण मी माझे काम करत राहणार. ओबीसी असो किंवा मराठा, जर कुणाच्याही घरावर हल्ला झाला, तरीही मी आवाज उठवत राहणार.

प्रश्न : सरकार मराठ्यांना घाबरते का?

भुजबळ : मला माहीत नाही. पण, त्यांचे मोर्चे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत विनाअडथळा सुरू असतात. आम्हाला मात्र रात्री १० वाजता सभा आवरण्यास सांगितले जाते, पण तरीही मी बोलत राहीन. सरकार आणि न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी याबाबतीत व्यापक दृष्टिकोन ठेवून ओबीसींवर अन्याय तर होणार नाही ना? याची काळजी घ्यावी. मला महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न विचारायचा आहे. गावात बंदी करणे, शिवीगाळ करणे, या सारख्या हिंसक कारवायांना त्यांचा पाठिंबा आहे का? पाठिंबा नसेल तर या विरोधात कुणीही बोलत का नाही?

प्रश्न : जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी सरकारच्या वतीने मंत्री पाठविणे चुकीचे होते का?

भुजबळ : उपमुख्यमंत्री भेटायला गेलेले नाहीत. माझे वरिष्ठ मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे इतर लोक का गेले? याबद्दल मी भाष्य करणार नाही. मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्राचे पुरावे मिळाल्यास त्यांना तसे प्रमाणपत्र दिले जावे का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी मला सुरुवातीला विचारणा केली होती. मी त्याला पाठिंबा दिला. पण, सुरुवातीला ५,००० आकडा थेट ११,००० वर गेला आणि नंतर दोन दिवसांच्या आत हा आकडा १३,५०० वर पोहोचला, हे कसे शक्य आहे? त्यानंतर पूर्ण राज्यात याबाबत चाचपणी केली गेली. अनेक ठिकाणी पेनाने नोंदी केलेल्या आढळल्या आहेत. असेच चालू राहिले, तर एक दिवस ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार हे नक्की.

हे ही वाचा >> लोकहो, महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत…!

प्रश्न : मंत्री म्हणून तुमचा सरकारवर विश्वास आहे?

भुजबळ : हो आहे, पण सरकारमधील लोकांनीही वास्तव तपासायला हवे. ओबीसी समाजाच्या बाजूने बोलणारी एक व्यक्ती तरी सरकारमध्ये असावी. जर आम्ही बोललो नाही, तर कुणीही ओबीसींच्या आरक्षणाचा बचाव करण्यासाठी पुढे येणार नाही. मी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी माझ्यावर टीका झाली. मी ५० हून अधिक वर्ष सामाजिक जीवनात असून आज माझ्याकडे मंत्रीपद आहे. मी आजवर कधीही महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण, जेव्हा जमाव आमदारांच्या घरावर हल्ला करतो, त्यांचे पोस्टर जाळतो, तेव्हा मी आत्मसंरक्षणाची भाषाही बोलायची नाही का? बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत कोणताही राजकीय नेता, सामाजिक विचारवंत किंवा संपादक का बोलत नाही? फक्त मराठा समाजाच्या मतांसाठी हे चालले आहे का? असे असेल तर मग आम्हाला सांगावे लागेल की, लोकसंख्येमध्ये ओबीसींचे प्रमाण ५४ टक्के आहे.

प्रश्न : भाजपाच्या वतीने तुम्ही ओबीसींबद्दल बोलत आहात?

भुजबळ : मी काय बोलावे, हे आजवर कुणीही मला सांगितलेले नाही, मग ते बाळासाहेब ठाकरे असोत किंवा शरद पवार. मी काय बोलायचे, हे भाजपा ठरवत नाही. माझ्या शब्दांमागे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि प्रेरणा आहे. ओबीसी, मागासवर्गीय आणि मराठा समाजासाठी माझी लढाई चालूच राहील.

प्रश्न : तुम्ही मंत्री आहात, मग तुमची ही भूमिका दुटप्पी ठरत नाही का?

भुजबळ : मी घेतलेल्या भूमिकेसाठी मला जरी राजीनामा द्यावा लागला, माझ्या आमदारकीवर पाणी सोडावे लागले तरी चालेल. अजित पवार सर्वोच्च नेते असलेल्या माझ्या पक्षाचे निर्देश मी पाळतो, मंत्रिमंडळात मुख्यमंत्री माझे वरिष्ठ आहेत आणि मंत्रिमंडळातील सर्वात मोठा पक्ष भाजपा आहे. जर यांनी सांगितले राजीनामा दे, तर मी माझा राजीनामा देण्यास तयार आहे. मी ओबीसींसाठी काम करत राहीन, मी थांबणार नाही.

हे वाचा >> “अजित पवार आणि छगन भुजबळांची भूमिका एकच”, बच्चू कडूंचं सूचक विधान

प्रश्न : अजित पवार यांनी तुम्हाला नरमाईची भूमिका घेण्यास सांगितले, खरे आहे का?

भुजबळ : जरांगे-पाटील जर त्यांच्या समाजाची बाजू मांडत असतील तर भुजबळ हे त्यांच्या समाजाची बाजू मांडत आहेत, असे अजितदादांनी स्पष्ट केले. इतरांना न दुखावता प्रत्येकाने आपापली बाजू मांडली पाहिजे, असेही ते म्हणाले. माझा आजही मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. ओबीसी समाज किंवा मला लक्ष्य केले जाईल, तेव्हाच मी बोलेन.

प्रश्न : या प्रश्नाचे निवारण कसे होणार?

भुजबळ : जातीनिहाय जनगणना करावी, त्यातून अनेक बाबी स्पष्ट होतील. जरी ओबीसींची संख्या त्यातून कमी आली, तरीही आम्ही ते स्वीकारू. या विषयावर आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घ्यायची आहे, पण ही भेट कधी होईल हे सांगता येत नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ready to resign as minister bjp does not write my script says chhagan bhujbal on jarange patil protest kvg