मोहन अटाळकर

अमरावती : माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडूंना येणारा संताप आणि हात उगारण्याच्या घटनांची चर्चा रंगू लागली आहे. शिंदे -फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याने बच्चू कडू यांची चिडचिड वाढलेली तर नाही ना अशीही कुजबूज सुरू झाली आहे. 

आपण कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावलेली नाही, केवळ हात करून थांब म्हटले. प्रसारमाध्यमांनी या घटनेचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले खरे, पण त्यांच्या आक्रमक शैलीमुळे याआधी अनेक वादग्रस्त प्रसंग घडले. त्या घटनांना या निमित्ताने उजाळा मिळाला आहे. मूळचे शिवसैनिक असलेल्या बच्चू कडूंनी स्वतंत्ररीत्या प्रहार संघटना स्थापन केली, नंतर पक्षाची बांधणी केली. अचलपूर मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आता ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. विस्ताराच्या वेळी मंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> फडणवीसांचे दुसरे सरकार अयशस्वी करण्यातही एकनाथ शिंदे यांचा सहभाग पुन्हा चर्चेत

मुंबईत मंत्रालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याला २०१६ मध्ये मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. २०२१ मध्ये अकोला जिल्हा रूग्णालयातील मेसमधील अव्यवस्था पाहून संताप आल्याने बच्चू कडूंनी तिथल्या स्वयंपाक्याच्या कानशिलात लगावली होती. वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अचलपूर न्यायालयाने त्यांना २०१८ मध्ये एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. २०१७ मध्ये नाशिक येथे आयुक्तांच्या अंगावर त्यांनी हात उगारला होता. अशा वागणुकीमुळे ते वादग्रस्त ठरत आले आहेत.
जनतेला, शेतकऱ्यांना, अपंगांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी, सरकारला वाकवण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बच्चू कडू यांची आंदोलने ही तितकीच आक्रमक आणि अभिनव असतात. गेल्या तीन वर्षांमध्ये सरकारमध्ये असल्यामुळे आंदोलने कमी झाली असली, तरी त्यांची आक्रमक शैली कायम आहे.

हेही वाचा >>> मित्रपक्षांवर दबावासाठी पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात खुद्द गिरीश गांधी यांनी बच्चू कडू यांचे कौतुक करतानाच त्यांचे कानही टोचले होते. ”तुम्ही ओरिजिनल बच्चू कडू म्हणूनच रहा. ओरिजिनॅलिटी कायम राहिल्यास तुमच्यातला कार्यकर्ता जागा राहील. सत्ता व मंत्रीपद येत-जात असतात, असे प्रसंग राजकारणात येत असतात. नेत्यांनी कार्यकर्त्याला विश्वासात घ्यावे, मात्र निर्णय स्वतः घ्यावा. सर्वांचा लोकशाहीवर विश्वास आहे. तुमच्या कामात खंड पडू देऊ नका. सध्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकार नावाची संस्था विसरूनच कार्य करावे” असा सल्ला गिरीश गांधी यांनी त्यांना दिला होता, त्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.
बच्चू कडू हे आपल्या वक्तव्यांमुळे कधी वादाच्या भोवऱ्यात सापडतात, तर संतापातून हात उगारण्यासारखे प्रसंग घडतात. अपंग, अनाथांविषयी कळवळा असल्याचे बच्चू कडू सांगतात. ते संवेदनशील आहेत, पण त्यांना वादाच्या प्रसंगाच्या वेळी संयम का ठेवता येत नाही, याचे कोडे कार्यकर्त्यांनाही आहे

Story img Loader