ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाचे वारे

भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीनंतर ठाणे जिल्ह्यात महायुतीमधून बंडाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे.

Rebellion start in mahayuti in Thane after first list of candidates announced by BJP
ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाची चिन्हे आहेत.(संग्रहित छायाचित्र)

ठाणे: भाजपने रविवारी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीनंतर ठाणे जिल्ह्यात महायुतीमधून बंडाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक यांनी मी निवडणूक लढवणारच असे जाहीर केले आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी गायकवाड कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष पवार यांनी निवडणूक लढणारच, कुठून ते लवकरच सांगू असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महायुतीत बंडाची चिन्हे आहेत.

स्थानिक राजकारणामुळे राज्यातील महायुतीच्या विद्यमान आमदारांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यात जिल्ह्यात मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, ठाणे, बेलापूर अशा विविध मतदारसंघांचा समावेश आहे. त्यातच रविवारी भाजपच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघातून भाजपचेच संदीप नाईक निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी येथून लढण्याची स्पष्ट संकेत दिले. आता मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे, असे संदीप नाईक यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होणार हे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-Onion Belt in Maharashtra: कांदा उत्पादक पट्ट्यात भाजपा यावेळी कशी कामगिरी करणार?

दुसरीकडे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड शिवसेनेच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यामुळे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड येथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. रविवारी भाजपने त्यांनाही अधिकृत उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही वर्षात येथे शिवसेना आणि भाजपचा उघड संघर्ष पाहायला मिळाला आहे. या संघर्षातून गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. याप्रकरणी ते सध्या तुरुंगात असले तरी त्यांच्या पत्नी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मात्र गायकवाड कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण अपक्ष निवडणूक लढवू, असे यापूर्वीच महेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी होणार असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-मुंबईतील भाजपच्या तीन आमदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार आणि बदलापूर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे इच्छुक आहेत. दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची विनंती केली होती. मात्र आता भाजपने कथोरे यांना येथून उमेदवारी जाहीर केल्याने येथेही बंडखोरीची शक्यता वर्तवली जाते आहे. मी निवडणूक लढणार आहेच, पण कुठून हे लवकरच सांगू अशी माहिती शिवसेनेचे सुभाष पवार यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघातही बंडखोरीची चिन्हे दिसू लागली आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rebellion start in mahayuti in thane after first list of candidates announced by bjp on sunday mrj

First published on: 20-10-2024 at 19:54 IST
Show comments