संतोष प्रधान

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली असतानाच आता शेजारच्या कर्नाटकमधील माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. कारण पक्षाच्या अनेक नेत्यांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे.

देशात समाजवादी चळवळीची पिछेहाट झाली असली तरी कर्नाटकात समाजवादी विचारांचा पगडा अद्यापही कायम आहे. यामुळेच काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांसमोर माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जनता दल (एस) हा पक्ष तग धरून होता. रामकृष्ण हेगडे, एस. आर. बोम्मई, जे. एच. पटेल, देवेगौडा व कुमारस्वामी या जनता दलाच्या नेत्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. कर्नाटक आणि बिहार वगळता अन्यत्र जनता दलाचे अस्तित्वही फारसे जाणवत नाही. कर्नाटकात तिसरी शक्ती म्हणून धर्मनिरपेक्षा जनता दलाची ताकद होती. ३५ ते ४० आमदार या पक्षाचे निवडून येत असत. या ताकदीवरच देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांनी एकदा भाजप तर दुसऱ्यांदा काँग्रेसच्या मदतीवर मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

आणखी वाचा-मोईत्रा यांच्या प्रकरणामध्ये भाजपाचा पक्षपातीपणा; दानिश अली यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाची पिछेहाट झाली. पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. आयुष्यभर निधर्मवादाची कास धरणारे माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यातून पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली. कर्नाटक जनता दलाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य नसून, जनता दलाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले जाईल, असे इब्राहिम यांनी जाहीर केले. त्यावर देवेगौडा यांनी त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय इब्राहिम यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली.

कर्नाटक जनता दलातील अनेक नेत्यांना भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय पटलेला नाही. यामुळे हे नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. देवेगौडा यांचा निर्णय मान्य नसलेली मंडळी पक्षातून बाहेर पडतील किंवा त्यांना पक्षातून बाहेर काढले जाईल. यातून धर्मनिरपेक्ष जनता दलात फूट पडणार हे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना तर अजित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील दोन प्रादेशिक पक्षात फूट पडली होती. कर्नाटकातही त्याची पुनरावृत्ती होणार आहे.

Story img Loader