नागपूर : विद्यमान खासदार असूनही केवळ भाजपने विरोध केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या कृपाल तुमाने (रामटेक) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशीम) या माजी खासदारांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही उमेदवार विदर्भातील आहेत. भावना गवळी यांना यवतमाळ-वाशीममधून तर कृपाल तुमाने यांना रामटेकमधून उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शिंदे गटाने या दोघांना उमेदवारी न देता यवतमाळमधून जयश्री पाटील व रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे गवळी व तुमाने नाराज होते. याचा फटका वरील दोन्ही मतदारसंघात महायुतीला बसला व ते पराभूत झाले होते. रामटेकमध्ये तर शिंदे गटाला भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांच्या रुपात उमेदवार दिले होते. मात्र पारवे यांचा पराभव झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे उमेदवारी नाकारण्यात आली असा थेट आरोप तुमाने यांनी केला होता. या वक्तव्याने महायुतीमध्ये खळबळ उडाली होती. अशाच प्रकारे अप्रत्यक्ष टीका करत भावना गवळी यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेनेच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारण्याचा ठपका भाजपवर ठेवला होता. तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारताना विधान परिषदेत पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, अशी सुत्रांची माहिती आहे. त्यानुसार त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. तेथील पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. विदर्भात शिंदे यांना फक्त बुलढाण्याची जागा जिंकता आली. तेही वंचितने घेतलेल्या लाखांवर मतांमुळे, त्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे यांनी तुमाने, गवळींचे पुनर्वसन केले. रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून रामटेक वगळता शिंदे गटाकडे एकही मतदारसंघ नाही, त्यामुळे तुमाने यांना विधानभेत कोठून उमेदवारी द्यायची हा प्रश्न होता. त्यांचे पुनर्वसन करायचे तर विधान परिषद हाच एक पर्याय होता. त्यांच्या विधान परिषदेवर जाण्याने शिवसेना शिंदे गटाला ग्रामीण भागात एक आमदार मिळणार आहे.