मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषविलेल्या माणिकराव ठाकरे यांची पक्षाने तेलंगण राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करून त्यांचे एक प्रकारे राजकीय पुनर्वसनच केले आहे. ठाकरे यांनी २००८ ते २०१५ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर विधान परिषदेचे उपसभापतीपद काही काळ त्यांच्याकडे होते. विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत संपताच पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली नव्हती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद, उपसभापतीपद तसेच आमदारकीची मुदत संपल्यापासून ठाकरे हे पक्षाच्या कोणत्याच महत्त्वाच्या पदावर नव्हते. पक्षांतर्गत राजकारणात ते मागे पडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे यांची अ. भा. काँग्रेसने तेलंगणा राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या वर्षाअखेर तेलंगणात विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेलंगणात दिवसेंदिवस काँग्रेसची पिछेहाट होत आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार रेवंथ रेड़्डी आणि पक्षाच्या अन्य नेत्यांमध्ये अजिबात एकवाक्यता नाही. रेवंथ रेड्डी यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. मावळते प्रभारी खासदार माणिकम टागोर हे खासदार रेड्डी यांना अनुकूल अशी भूमिका घेतात, अशी नेत्यांची तक्रार होती. यातूनच टागोर यांना हटवून माणिकराव ठाकरे यांना प्रभारीपदी नेमण्यात आले आहे.

हेही वाचा… कोकण शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मदार आयात उमेदवारावर

तेलंगणात एकूणच पक्षाची अवस्था तोळामासा असताना पक्षात फूट पडणार नाही व पक्ष संघटना वाढेल अशी दुहेरी आव्हाने ठाकरे यांना स्वीकारावी लागणार आहेत. या नियुक्तीमुळे ठाकरे यांना राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली आहे.

हेही वाचा…कोकण शिक्षक मतदारसंघ कायम राखण्याचे शेकाप समोर आव्हान

नितीन राऊत यांची निवड

विदर्भातील काँग्रेसचे दुसरे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांची गुजरातमधील पराभवाची कारणमिमांसा करण्याकरिता नेमण्यात आलेल्या सत्यपालन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिस्तरीय समितीचे अध्यक्षपद राऊत यांच्याकडे आहे. नितीन राऊत हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rehabilitation of manikrao thackeray within party print politics news asj
Show comments