बोराळा ( जि. वाशीम ) : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पश्चिम विदर्भात मंगळवारी दाखल होताच बोराळा हिस्सा गावानजीकच्या एका मैदानात थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जमलेल्या पारंपरिक वेशातील आदिवासींनी यात्रेकरुंचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक सण, उत्सव, महापुरुषांची जयंती यांचे दिनमहात्म्य जपण्याची परंपरा या यात्रेदरम्यान देखील पाळली गेली.
राहुल गांधी यांच्या सह यात्रेकरू सकाळच्या सत्रात पदयात्रा पूर्ण करून बोराळा हिस्से या गावानजीक उभारलेल्या राहूटीत पोहोचले. ठिक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या गावाजवळ एका शेतात मैदान तयार करण्यात आले होते. या ठिकाणी राहुल गांधी यांचे विचार ऐकण्यासाठी दुपारच्या उन्हातही आदिवासी बांधव पायी चालत पोहचत होते. पारंपरिक वाद्य वाजवत लोक जयघोष करीत होते. जागोजागी झेंडे, पताका आणि राहुल गांधी यांचे भव्य कट आऊट लक्ष वेधून घेत होते.
हेही वाचा… सुनील टिंगरे : युवकांमध्ये लोकप्रिय
बिरसा मुंडा यांच्या त्यागाचा, त्यांच्या कार्याचा उजाळा जनभावनेतून व्यक्त होत होता. भारत जोडो यात्रेत विविध जाती, धर्म, पंथाचे लोक सामील होत आहेत, त्यात आज या भागातील आदिवासी समुदायाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. राहुल गांधी यांना पाहण्यासाठी लोक धावपळ करीत होते, एक चिमुकली मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींचे लक्ष आपल्याकडे किमान एकवेळ तरी जावे, अशी प्रार्थना करीत होती. राहुल गांधी यांच्याशी संवाद व्हावा, याची धडपड काँग्रेसचे नेते करीत असताना सर्व सामान्यांची अपेक्षा फक्त राहुल गांधी यांना पाहता यावे, अशी होती.
रस्त्याच्या दुतर्फा लोक राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी गर्दी करून उभे होते. वाशीम जिल्ह्यात बिरसा मुंडा यांचा जयंती उत्सव यात्रेच्या निमित्ताने उजळून निघाला.