नागपूर : भाजपविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ सभा घेऊन एकजुटीचा संदेश दिला खरा, पण आता काँग्रेस नेतेच आपसात भांडत असल्याने पक्षात बेदिली माजली असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्हाध्यक्षाला कार्यमुक्त केल्याच्या मुद्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. वडेट्टीवार यांनी पटोले यांना लक्ष्य केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी केली. या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून दूर करण्यात आले आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून रितेश तिवारी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला. देवतळे हे वडेट्टीवार यांचे तर तिवारी धानोरकर यांचे समर्थक आहेत. धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी छुपी लढाई सुरू आहे. त्याचा परिपाक म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पक्षातील गटबाजी होती.
देवतळे यांच्यावरील कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत पटोले ओढल्या गेले. या निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्षांनी कोणत्याही निवडणुकीत भाजपशी युती करायची नाही. तसेच त्या पक्षाला फायदा होईल ही कृती करायची नाही, असे काही घडल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेश दिले होते. त्यानंतरही भाजपशी युती करण्यात आली होती. त्यामुळे तातडीने निर्णय घेत जिल्हाध्यक्षांना कार्यमुक्त करण्यात आले. ही कारवाई वडेट्टीवारांसह इतरांसाठीही धक्का होता. कारण, काँग्रेसमध्ये अशाप्रकारे धडाडीने प्रकरण मार्गी लावण्याची प्रथा नाही. अनेक महिने लोटून गेल्यानंतरही कोणताही ठोस निर्णय न घेण्याची पद्धत पक्षात रूढ आहे. त्यामुळे साहजिकच त्यांचे पडसाद पक्षात उमटले.
पक्षातील अनेक नेते पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत खासगीत नाराजी व्यक्त करू लागले. जिल्हाध्यक्षावरील कारवाईबाबत पक्षात प्रक्रिया ठरली आहे. त्यानुसार आधी हे प्रकरण शिस्तपालन समितीकडे जायला हवे होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार योग्य ती कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, या प्रकरणात असे काही घडले नाही. वडेट्टीवार यांना सूचक संदेश देण्यासाठी तडकाफडकी जिल्हाध्यक्षांना कार्यमुक्त केले. या कारवाईने वडेट्टीवार संतापले आणि त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केले. महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवायची असेल तर प्रत्येकाने सांभाळून बोलावे, असा टोमणा त्यांनी पटोलेंचे नाव न घेता मारला. एवढेच नव्हेतर प्रदेशाध्यक्षांच्या अधिकाराबाबतही शंका उपस्थित केली.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, मी प्रतिक्रिया द्यावी एवढे मोठे ते नेते नाहीत, असा टोला पटोले यांनी हाणला. अशाप्रकारे स्थानिक राजकारणात वर्चस्व टिकवण्यासाठी एकमेकांचे वाभाडे काढून काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची मूठ घट्ट नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.