मुंबई : नागपूरमध्ये होणारा सौर पॅनेल प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नसून आम्ही महाराष्ट्रातच गुंतवणूक करणार असल्याचे रिन्यू कंपनीने स्पष्ट केले आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचा आरोप खोटा, दिशाभूल करणारा व बेजबाबदारपणाचा आहे, असे कंपनीने नमूद केले आहे.
हेही वाचा : काश्मीर बदल रहा है! शून्य मतदान होणाऱ्या गावात यंदा प्रचंड मतदान
रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आहे आणि राज्यासाठी आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात कंपनीचे ५५० मेगावॉट स्थापित क्षमतेचे प्रकल्प सुरू असून आणखी दोन हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमध्ये सुमारे १५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून ते २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रातही रिन्यू कंपनी राज्यात काम करणार असून यातून ३० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला ५५० मेगावॉट वीज स्पर्धात्मक दरात देत असून, पूर्ण झालेल्या आणि काम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करीत असल्याचे रिन्यू कंपनीने म्हटले आहे.