नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध केलेली बंडखोरी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली प्रारूप (सांगली पॅटर्न) म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे अनेक मतदारसंघात लढत होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात असाच प्रयोग करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काटोलमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनिल देशमुख विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा याच पक्षासाठी सोडली जाणार हे निश्चित आहे. काटोलमध्ये भाजपकडून तीन प्रमुख दावेदार आहेत. माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर, माजी आमदार आशीष देशमुख आणि माजी नगरसेवक अविनाश ठाकरे हे भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत. ठाकूर यांचा गेल्यावेळी अनिल देशमुख यांनी पराभव केला होता. आशीष देशमुख यांनी २०१४ मध्ये अनिल देशमुख यांना पराजीत केले होते. आता माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार येथून काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांचे मूळ गाव या मतदारसंघात आहे. ते तीन-चार वर्षांपासून येथे सक्रिय देखील झाले आहेत. जिचकार यांनी युवकांसाठी रोजगार शिबिरेही घेतली. दुसरीकडे २०१४ चा अपवाद सोडला तर अनिल देशमुख १९९५ पासून काटोलमधून निवडून येत आहेत. जिचकार यांच्यामुळे देशमुख यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा – पवार ते पवार असा आमदार हिरामण खोसकर यांचा राजकीय प्रवास

हेही वाचा – प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये ‘तुतारी’ चा आवाज वाढला

अपक्षांना संधी देण्याचा काटोलचा इतिहास

काटोलमध्ये अपक्ष उमेदवारांना अधिक संधी मिळण्याचा इतिहास आहे. अनिल देशमुख स्वतः १९९५ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. १९८५ मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांना देखील अपक्ष उमेदवार सुनील शिंदे यांनी पराभूत केले होते. ही पार्श्वभूमी बघता याज्ञवल्क्य जिचकार हे अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.