नीलेश पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून जम बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी नाट्याचा वाद चांगलाच उफाळला असून डॉ. विक्रांत मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पाठविल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याची भावना निर्माण झाल्यानेच मोरे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. परंतु, मोरे यांनी पुढील राजकीय वाटचालीविषयी बाळगलेले मौन सूचक मानले जात आहे.

काय घडले ? काय बिघडले ?

पाच ते सहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या डाॅ. विक्रांत मोरे यांच्यावर शिवसेनेने जिल्हाप्रमुख पदाची धुरा सोपवली होती. त्यावेळी जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व नगण्य होते. मोरे यांच्या प्रयत्नांमुळे शिवसेनेचे पहिल्यांदाच नंदुरबार नगरपालिकेत चार नगरसेवक निवडून आले. तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्या शिवसेनेत असलेले चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी हातमिळवणी करून मोरे यांनी नंदुरबार पालिकेत शिवसेनेला सत्तेचा वाटाही मिळवून दिला. त्यानंतर दोनच वर्षात विधानसभा निवडणुकांआधी आमदारकीचा राजीनामा देत रघुवंशी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेत वादातील ठिणगी तेव्हापासूनच पडली.

रघुवंशी यांच्याआधी जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर मोरे यांची भक्कम पक्कड होती. रघुवंशी यांच्या पक्षप्रवेशानंतर जिल्हा परिषदेत शिवसेना सत्तेची वाटेकरीदेखील झाली. धडगाव नगरपरिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. पक्षाची अशी घोडदौड सुरू असताना जिल्हाप्रमुख असूनही मोरे यांना विश्वासात न घेता अनके निर्णय घेतले जाऊ लागले. त्यातच नंदुरबारच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या कोट्यातील एकाला संधी मिळावी आणि स्विकृत म्हणून अजून एकाची निवड व्हावी, अशी मोरे यांची मागणी होती. परंतु, या मागणीला केराची टोपली दाखवली गेली. तेव्हापासून मोरे यांची नाराजी ठळकपणे जाणवू लागली. मोरे यांनी आपली नाराजी थेट उघड न करता एप्रिल महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा सादर केला. या पत्रात त्यांनी जिल्ह्यातील राजकारण व्यक्ती केंद्रीत होत असल्याचा आरोप करत पक्षाचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचा दावा केला. पत्रात त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांचा सर्व रोष अप्रत्यक्षपणे रघुवंशींकडेच आहे हे उघड गुपित होय.या नाराजी नाट्यानंतर मोरे हे शिवसेनेच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहिले नाहीत. शिवसंपर्क अभियानापासूनही ते दूरच राहिले. सध्या वरिष्ठ स्तरावरून मोरेंच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहे. शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्याबरोबर त्यांच्या बैठका झाल्या असल्या तरी याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.

संभाव्य राजकीय परिणाम

नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना रुजविण्यासाठी डाॅ. मोरे यांनी प्रयत्न केलेले असल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे योगदान दुर्लक्षित होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच त्यांची मनधरणी केली जात आहे. परंतु, त्यात यश न आल्यास भाजप या संधीचा फायदा उठविण्यासाठी तयार आहे. खासदार डॉ. हिना गावितांच्या माध्यमातून मोरे यांच्या भाजप प्रवेशासाठी दोन ते तीन बैठका देखील झाल्याचे सांगण्यात येते. मोरे मात्र सावध भूमिकेत असून राजीनाम्याचे वगळता इतर कोणत्याही विषयावर त्यांच्याकडून बोलणे टाळले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation of shivsena nandurbar district head clearly shows internal disputes in shivsena pkd
Show comments