काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. त्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेशमधून डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये पोहचेल. त्यापूर्वीच राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. त्यामुळे ‘भारत जोडो यात्रा’ राजस्थानमध्ये येण्याआधी हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छूक होते. यासाठी काँग्रेसच्या ‘एक पद एक व्यक्ती’ या नियमानुसार अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागणार होते. पण, अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्षपद असे दोन्ही संभाळू इच्छित होते.
याला काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी जोरदार विरोध केला. कारण, अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाले असते सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा येणार होती. यावरून बराच वादंग झाला. अशोक गेहलोत यांच्या काही आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी देत काँग्रेस नेतृत्वावर दबाव आणण्याची प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले. अखेर मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष बनले.
त्यानंतर आता काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच, २०२३ साली राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासह अन्य काही प्रश्नांबाबत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आमदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशा सूर उमटत आहे. यासाठी झालावाड, कोटा आणि बुंदी येथे पत्रकार परिषदाही घेण्यात आल्या आहे.
हेही वाचा : राजीव गांधी हत्या प्रकरण: दोषींच्या सुटकेचे तामिळनाडूच्या राजकारणात पडसाद का उमटले नाहीत?
याबाबत बोलताना बुंदीचे माजी जिल्हाध्यक्ष सत्येश शर्मा यांनी म्हटलं, “भारत जोडो यात्रेबद्दल उत्साह असताना, राज्य काँग्रेसमध्ये शांतता पसरली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि आमदार मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयची वाट पाहत आहेत. यामुळे पक्षात सुरु असलेली धुसफूस संपेल. तरच, येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकदिलाने काम करु.”
तर, कोटा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा सरोज मीना यांनी अशोक गेहलोत यांना लक्ष्य केलं आहे. “२०२३ च्या विधानसभा निवडणुकीसाठी एक वर्षांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने आमदारांशी चर्चा करुन सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपदी बसवावे. तसेच, गेल्या चार वर्षापासून मुख्यमंत्री गेहलोत यांना भेटण्यासाठी वेळ मागत आहे. तरीही मला वेळ देण्यात आली नाही,” असा हल्लाबोल सरोज मीना यांनी केला.
हेही वाचा : तीन दशकांपासून भाजपाचा आमदार, गुजरात दंगलीची झळ सोसलेल्या ‘नरोडा’ जागेवर यावेळी कोण जिंकणार?
माजी आमदार कैलास मीना, माजी नगराध्यक्ष मुबारिक मन्सुरी, काँग्रेसचे नेते सुरेश गुर्जर यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत थोडा कालावधी बाकी राहिला आहे. त्यापूर्वी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करावे. २५ सप्टेंबरलाच पायलट यांना मुख्यमंत्री करायला हवे होते, असा एकच सूर सर्व नेत्यांकडून निघत आहे. त्यामुळे आगामी काळात सचिन पायलट हे मुख्यमंत्री होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.