नागपूर : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर नव्याने संघटन बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याने आता राज्यातील पक्ष वाढीची जबाबदारी पुन्हा विदर्भातील नेत्यांकडेच येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ १६ आमदार निवडून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांचा पराभव झाला. काँग्रेसला ज्या १६ जागांवर विजय मिळाला, त्यापैकी नऊ जागा विदर्भातील आहेत. यामध्ये अकोला पश्चिममधून साजिद खान पठाण, रिसोड अमित झनक, उमरेड संजय मेश्राम, पश्चिम नागपूर विकास ठाकरे, नागपूर उत्तर नितीन राऊत, साकोली नाना पटोले, आरमोरी रामदास मसराम, ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार, यवतमाळ अनिल ऊर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे विदर्भातील अमरावती, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच ठिकाणी खासदार आहेत.

हेही वाचा >>>बावनकुळे, शेलार यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी कायम; मंत्रिमंडळातील नावांबाबत चर्चा सुरू

राज्यात काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची संख्या विदर्भात अधिक आहे. तसेच विधान परिषदेचे आमदार देखील विदर्भातून गेले आहेत. त्यामुळे पक्ष वाढीसाठी आवश्यक रसद येथूनच मिळू शकते.त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी पटोले आणि वडेट्टीवार यांच्यावरच पक्षवाढीची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.

आम्हाला विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही. हा जनतेचा कौल नाही, ‘ईव्हीएम’ची कमाल आहे. निवडणूक मतपत्रिकेवर झाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन उभे करणार आहोत. सोबतच पक्ष वाढीसाठी राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते मिळून प्रयत्न करू.-अतुल लोंढेमुख्य प्रवक्ते, प्रदेश काँग्रेस.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility for congress expansion lies with vidarbha nine out of 16 seats won included print politics news amy