संतोष प्रधान

विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून पक्षसंघटनेत स्थान मिळावे, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली असली तरी पक्षांतर्गत निवडणुका पार पडेपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केल्याने अजितदादांला लगेचच प्रदेशाध्यक्ष किंवा पक्ष संघटनेत अन्य कोणतेही पद मिळण्याची चिन्हे नाहीत.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन समारंभात अजित पवार यांनी पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ‘पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. पक्ष कसा चालवतो ते बघा’, असा आक्रमक पवित्रा अजित पवार यांनी घेतला होता. विरोधी पक्षनेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा प्रदर्शित करीत अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अधिक कोंडी केली. कारण अलीकडेच सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. अजित पवार हे पक्षसंघटनेत सक्रिय झाल्यास पुन्हा अजित आणि सुप्रिया हे समीकरण साधणे कठीण जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडल्यावर संघटनात्मक बदलांवर विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. संघटनात्मक निवडणुका पार पडेपर्यंत प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य कोणत्याही पदात बदल केला जाणार नाही. यातून शरद पवार यांनी अजित पवार यांना सध्या तरी थांबण्याचा संदेश दिला आहे. अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्षपदावर डोळा असला तरी हे पद लगेचच मिळणार नाही हेच पक्षाच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया कामय ठेवत प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लांबविला जाईल, अशीही शक्यता वर्तविली जाते. पुढील दोन ते तीन महिने तरी काही बदल अपेक्षित नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.