पुणे : महायुतीमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा कळीचा झाला असल्याने या मतदारसंघातून कोणाला मतदारांंची पसंंती मिळू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी महायुतीकडून पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या गुप्त बैठकीत हा मध्यममार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे आता वडगाव शेरीची उमेदवारी ही सर्वेक्षणानंतर निश्चित होणार असल्याने विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांचे भवितव्य सर्वेक्षणावर अवलंबून आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेमध्ये ज्या मतदारसंघात महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षाचा आमदार असेल ती जागा संबंधित पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार या मतदारसंघांमधील जागेवर टिंगरे यांनाच संधी मिळेल, अशी शक्यता आहे. या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी आपल्या मुलासह सहा ते सात माजी नगरसेवकांसह गेल्या महिन्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे. काही वर्षांपूर्वी पठारे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा – निवडणुकीचे पडघम वाजू लागताच भाषा, साहित्य-संस्कृतीला लाभ
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी आमदार बापू पठारे यांनी खराडी भागात महामेळावा घेतला होता. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. या मेळाव्यात भाषण करताना शरद पवारांनी कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेनंतर वडगाव शेरी मतदारसंघात जोरदार चक्र फिरली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सुनील टिंगरे यांची देखील गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. या भागात पोर्श कार प्रकरणानंतर आमदार टिंगरे यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत भाजपला द्यावा, अशी चर्चा झाल्याचे समजते.
या मतदारसंघातून कोणी निवडणूक लढवावी यासाठी येथे पुन्हा एकदा सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मतदारसंघात पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या निर्णयामुळे हा मतदारसंघ भाजपकडे येण्याची शक्यता वाढल्याने भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी जोरदार ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.
हेही वाचा – फेरीवाला समितीची अधिसूचना काढा, कोणी केली ही मागणी
पोर्श अपघात प्रकरणात भरधाव वेगाने कार चालवून दोन जणांना उडविणाऱ्या अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न या भागातील आमदार टिंगरे यांनी केला. दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्याऐवजी हा ‘दिवट्या’ आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. यांना सत्तेचा माज चढला असून, त्यांचा बंदोबस्त मतदार करतील, असे म्हणत शरद पवार यांनी आमदार टिंगरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
या सभेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भागात विकासकामाची उद्घाटने घेत जाहीर सभा घेतली. यावेळी पक्षाचे आमदार टिंगरे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. काही व्यक्ती जाणीवपूर्वक आमदार टिंगरे यांना बदनाम करण्याचे काम करत असल्याची टीका अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली होती.