छत्रपती संभाजीनगर : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी उत्सुक असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या मतदारसंघात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. भाजप नेत्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यांच्या नावाची लोकसभा उमेदवार म्हणून चर्चा व्हावी यासाठी अनेकांना दूरध्वनीवरुन कल जाणून घेण्यासाठी दूरध्वनी आले आहेत. ‘शासना’ च्या विविध योजनांतून ‘भाजप’ नेत्यांना मदत होईल, अशा अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष घालणारे प्रवीणसिंह परदेशी धाराशिव जिल्ह्यात एवढे का रमतात, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. ‘बहु जहाले इच्छूक’ असा नाट्यप्रयोग होईल एवढी संख्या असली तरी उमेदवारी नक्की होईपर्यंत अनेकजण यादीत आपला क्रमांक लागू शकतो आणि तसे झाले तर काय रणनीती आखता येईल याचे नियोजन करत आहेत. तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर पगडा आहे. त्यामुळे त्यांनी भाजपची उमेदवारी घ्यावी, असे पहिल्या टप्प्यात सांगण्यात येत होते. मात्र, ते इच्छूक नाहीत. त्यांनी तसे पक्षातील वरिष्ठांनाही सांगितले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक पर्याय आजमावून पाहिले जात आहेत. अलीकडेच काँग्रेसमधून आलेले बसवराज पाटील यांचेही नाव लिंगायत मतांच्या बेरजेतून घेतले जात आहे. औसा, बार्शी, तुळजापूर या मतदारसंघात लिंगायत मतांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, केवळ तेवढ्या जातीच्या गणितावर निवडून येणे शक्य होणार नाही. या मतपेढीचा आधार घेऊन बसवराज मंगरुळे या भाजपच्या पदाधिकाऱ्याने उमेदवारीवर दावा केला आहे. भाजपचे जुने व ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद पाटील, नितीन काळे ही मंडळीही या यादीत आपले नाव असू शकेल का, याचा नियमित आढावा घेत असतात. एवढे उमेदवार असतानाही प्रवीणसिंह परदेशी यांचेही नाव चर्चेत आले आहे.
हेही वाचा… शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह राजकीय विरोध सुरू, निवडणूक प्रचारात मुद्दा तापणार
काही महिन्यांपूर्वी किल्लारीतील भूकंपामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आपल्याला माहीत आहे का, त्यांचे काम कसे होते वगैरे असे प्रश्न विचारणारे दूरध्वनी येऊन गेले. तेव्हापासून प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत आहे. मोदी लाट आहेच, शिवाय राममंदिर आणि ३७० कलमामुळे उमेदवार कोणी का असेना निवडणूक आपणच जिंकू, या भरवशावर आता काही सनदी अधिकाऱ्यांना रिंगणात उतरविण्याची तयारी भाजप करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसिंह परदेशी यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपानंतर पुनवर्सनाच्या कामाला नवे आयाम दिले हाेते. तेव्हाच्या लोकप्रियतेच्या आधारे त्यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा धडका लावला आहे. ‘मित्रा’ या राज्य सरकारला सहाय्य करणाऱ्या दालनातून केवळ एका जिल्ह्यात एवढे कार्यक्रम कसे, असाही प्रश्न विचारला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना काही सांगितले असल्यास आम्हाला काही माहीत नाही. मात्र, ते जिल्ह्यात सक्रिय आहेत, असे भाजपच्या एका नेत्याने ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. प्रवीणसिंह परदेशी यांच्याबरोबरच आणखीही एका सनदी अधिकाऱ्याचे नाव धाराशिव जिल्ह्यात चर्चेत आहे. ‘जिंकून येण्याची शक्यता’ या एकमेव निकषाबरोबरच ज्यांना उमेदवारी मिळेल ती व्यक्ती निवडून येईल असे गृहीत धरुन सनदी अधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आणली जात आहेत. आचारसंहिता लागण्यास काही दिवसच असताना चर्चेत असणारी नावे आता पुन्हा पुढे आणली जात आहेत.
हेही वाचा… आमदार भास्कर जाधवांचे मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव तंत्र ?
निवडणूक लढविण्याबाबत आपण काही विचार केलेला नाही. धाराशिव, सोलापूर व लातूर या तीन जिल्ह्यांत आपण विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून काम करीत आहोत. – प्रवीणसिंह परदेशी, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी