लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या राज्यातील दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची चांगलीच निराशा झाली आहे. कारण त्यांचा उमेदवारीसाठी विचारच झाला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना भाजपने बागपतमधून पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. तर दुसरे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक हे ओडिशातून निवडणूक लढवित आहेत. याचप्रमाणे ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निवडणूक रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मोपलवार हे भाजपच्या वतीने नांदेड अथवा हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदावरून दूर होताना मोपलवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. लोकसभा लढण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. नांदेड वा हिंगोलीत लढण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. पण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने नांदेड व हिंगोलीतील सारी समीकरणेच बदलली. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अन्य कोणाची भाजपला गरजच भासली नाही. हिंगोलीची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहिली. यामुळे मोपलवार यांचा नांदेड किंवा हिंगोलीसाठी विचार झाला नाही. आता विधानसभा निवडणुकीत मोपलवार यांना आशा आहे.

हेही वाचा : “लोकसभा निवडणूक IPLसारखीच अन् काँग्रेसकडे कर्णधार नाही,” भाजपाचा हल्लाबोल

‘मित्र’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि केंद्रातील ‘कॅपेसिटी बिल्डिंग आयोगा’चे सदस्य निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनाही लोकसभा लढण्याचे वेध लागले होते. त्यांनी उस्मानाबाद या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांच्या उस्मानाबादच्या फेऱ्या वाढल्या होत्या. तसेच या भागाच्या विकासात त्यांनी पुढाकार घेतला होता. ‘लोकसभा लढण्याची तयारी नाही,. पण कोणी विनंती केल्यास जरूर विचार करू’, अशी प्रतिक्रिया परदेशी यांनी व्यक्त केली होती. पण महायुतीत उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे कायम राहिला. परदेशी हे भाजपकडून लढण्यास इच्छूक होते. शिंदे गटाने भाजपचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नीला भाजपमधून प्रवेश देऊन उमेदवारी दिली आहे. या घडामोडींमुळे मोपलवार किंवा परदेशी यांची लढण्याची इच्छा असूनही त्यांच्या उमेदवारीबाबत विचार झाला नाही.

सत्यापाल सिंह यांना उमेदवारी नाकारली

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना २०१४ मध्ये सेवेचा राजीनामा देत उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघातून निवडून आलेले सत्यपाल सिंह यांना तिसऱ्यांदा उमेदवार मिळू शकलेली नाही. भाजपने राष्ट्रीय लोकदलाबरोबर केलेल्या युतीमुळे बागपत मतदारसंघ हा मित्र पक्षाच्या वाट्याला गेला. २०१४ मध्ये चौधरी अजितसिंह तर २०१९ मध्ये त्यांचे पुत्र जयंत चौधरी यांचा सत्यपाल सिंह यांनी पराभव केला होता. जयंत चौधरी आता भाजपबरोबर आल्याने सत्यपाल सिंह यांना पक्षाने उमेदवारी नाकारली.

हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?

पटनायक, लक्ष्मीनारायण रिंगणात

मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त अरुप पटनायक हे पुन्हा ओडिशामधून नशीब अजमवित आहेत. २०१९च्या निवडणुकीत भूवनेश्वर मतदारसंधातून पटनाटक हे पराभूत झाले होते. यंदा ते पुरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवित आहेत. पटनायक यांची लढण्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरीच्या विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारली होती. ठाण्याचे माजी सहपोलीस आयुक्त आणि सीबीआयचे माजी सहसंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी विशाखापट्टणम उत्तर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लक्ष्मीनारायण हे जय भारत राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. गेल्या निवडणुकीत लक्ष्मीनारायण हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. ठाण्याचे माजी महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर हे भारत राष्ट्र समितीचे आंध्र प्रदेशचे अध्यक्ष होते. पण निवडणुकीच्या तोंडावर ते पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती.