राजेश्वर ठाकरे
नागपूर : वायुसेनेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर गांधी विचाराचा पगडा असणारे संदेश सिंगलकर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी राजकारणातून दिशा मिळू शकेल, असे मत झाल्यावर काँग्रेसमध्ये आले आणि अभ्यासूवृत्तीमुळे संघटनेत महत्त्वाच्या पदावर गेले.
सिंगलकर यांचे वडील यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते.
वडील गांधी विचारांचे. विनोबांच्या भूदान चळवळीत त्यांनी जमीन दान दिली होती. कुठलाही राजकीय वारसा नाही, वायुदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विदर्भ आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्याकरिता अनेक आंदोलने केली. संपूर्ण विदर्भाचा दौरा केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन विदर्भाचा मुद्दा कसा रेटून धरायचा याबाबत मांडणी केली. एवढेच नव्हे तर स्वतंत्र विदर्भाची चळवळ विदर्भात सर्वदूर पोहचवण्याकरिता ‘विदर्भ मिरर’ हे साप्ताहिक सुरू केले.
हेही वाचा: सचिन पाटील : कर्तव्यदक्ष लोकसेवक
आंदोलन करताना असे लक्षात आले की, विदर्भाच्या लढाईला राजकीय मार्गातूनच दिशा मिळू शकते हे ठाम मत झाल्यावर स्वतः गांधी विचाराचे असल्यामुळे काँग्रेसचा मार्ग निवडायचा हे ठरवले. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून निवडणूक राजकारणापासून तूर्तास दूर राहिले. त्यांची कार्यपद्धती, बोलण्याची शैली पाहून नागपूर शहर काँग्रेसच्या प्रवक्तेपदी सिंगलकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर माध्यमांमध्ये पक्षाची भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर बढती मिळाली. त्याचकाळात महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सदस्य झाले.
हेही वाचा: रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व
जकार्ता, इंडोनेशिया येथे आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी संपूर्ण भारतातून तीन युवकांची निवड करण्यात आली होती, त्यातला ते एक होते. तिथे महिला बचत गटाची कार्यपद्धती या विषयावर त्यांचे सादरीकरण झाले. सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये सचिव या पदावर ते काम करीत आहेत. पक्षाने त्यांना देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी त्यांना पक्षातर्फे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समन्वय समितीमध्ये निवड करण्यात आली. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.