मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक ऑक्टोबरला येथे येणार असून मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीच्या निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. यासंदर्भातील बैठक दादर येथील स्वामीनारायण मंदिरातील सभागृहात घेण्यात येणार आहे. शहा यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात नुकताच दौरा करून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

आता ते मुंबईतील ३६ मतदारसंघांबाबत पदाधिकारी, आमदार-खासदार, जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई वगळता अन्य जागांवर भाजप किंवा महायुतीला फटका बसला. वायव्य मतदारसंघातून रवींद्र वायकर हे केवळ ४७ मतांनी विजयी झाले आणि सहापैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीला चांगले यश मिळावे, यासाठी बरीच मेहनत मुंबईत घ्यावी लागणार आहे. त्याचा आढावा शहा या बैठकीत घेतील व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, असे सूत्रांनी सांगितले.