भंडारा : भंडारा-गोंदिया हा ‘दिग्गजांना पराभूत’ करणारा मतदारसंघ, अशी ओळख असून येथील राजकीय समीकरणे प्रत्येक वेळी बदलतात. यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पातळीवरील पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच या मतदारसंघात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळाल्याने भाजपचे गणित यंदा अधिक सोपे झाल्याचे मानण्यात येते.
पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदारसंघात मतदान असून प्रचार शिगेला पोहचला आहे. एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. अधिकृत उमेदवाराविरुद्ध भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील असंतोषांनी बंड पुकारले. भाजपचे संजय कुंभलकर हे बसपच्या तिकिटावर तर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये हे दोघे अपक्ष मैदानात उतरले. वंचितने संजय केवट नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात बंडखोरीचा फटका भाजप आणि काँग्रेस उमेदवाराला बसू शकते, असा अंदाज होता मात्र मागील १० दिवसात त्यांची बंडखोरी निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुनील मेंढे यांनी तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी व शिंदे यांची शिवसेना आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्याचा फायदा मेंढे यांना होऊ शकतो. शिवाय मेंढे हे संघाशी जुळलेले असल्याने संघाचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. मतदारसंघात भाजपचे संघटन मजबूत आहे. असे असले तरी मेंढे यांनी मागील पाच वर्षात या मतदारसंघात विकासकामे केलेली नसल्याने मतदारांचा त्यांच्यावर रोष आहे. खासदार म्हणून निवडून आल्यावरही मेंढे यांनी भंडारा नगरपरिषदेचे अध्यक्षपद न सोडल्याने पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज आहेत. मेंढे यांच्या समर्थनार्थ त्रिशक्ती एकवटली असली तरी पक्षांतर्गत असंतोषाचा फटका त्यांना बसू शकतो. मोदी लाट आणि पटेलांची साथ यामुळे यावेळीही त्यांची नौका पार होऊ शकते, अशी शक्यता आहे.
हेही वाचा… भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?
महाविकास आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या निमित्ताने तब्बल २५ वर्षांनंतर मतदारसंघात काँग्रेसचे पंजा हे चिन्ह पहायला मिळते. यामुळे त्यांना काँग्रेसची पारंपरिक मते त्यांना मिळू शकतात. मात्र पक्षाचे जुने आणि मोठे योगदान देणारे अनेक इच्छुक रांगेत असताना तुलनेने नवख्या पडोळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने निष्ठावंत दुखावले. त्यातच काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत काँग्रेसच्याच उमेदवाराला आव्हान दिले आहे. हे करताना त्यांनी प्रशांत पडोळे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केले. अडचणीच्या काळात मीच पक्ष सांभाळला, असा दावा वाघाये यांनी केला. माजी मंत्री बंडू सावरबंधे हे सुद्धा रिंगणात आहेत. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बंडूभाऊ यांची पवनी तालुक्यात पकड आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर पक्षांतर्गत धुसफूस आणि निष्ठावंतांची नाराजी बघता आता नाना पटोले हे काँग्रेसचे पडोळे यांना कसे तारतील हा प्रश्न आहे. दिवंगत यादवराव पडोळे यांचे नाव आणि त्यांची पुण्याई ही बाब पडोळेंची जमेची बाजू आहे. या मतदारसंघाचा नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा इतिहास आहे हे येथे उल्लेखनीय.बसपचे उमेदवार संजय कुंभलकर आणि वंचितचे संजय केवट हे कोणाची मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. २०१९ मध्ये वंचितच्या उमेदवाराने ४५ हजार ८४२ तर बसपच्या उमेदवाराने ५२ हजार ६५९ मते घेतली होती. संजय कुंभलकर तेली समाजाचे प्रतिनिधित्व करीत असले तरी समाजाचा कोणताही मोठा नेता त्यांच्यासोबत नाही.
जातीय समीकरणे
या मतदारसंघात कुणबी तेली आणि पोवार या समाजाचे वर्चस्व आहे. कुंभलकर हे तेली आहेत तर मेंढे आणि पडोळे हे कुणबी आहेत. जातीचे निकष लावले तर पोवार समाज कोणाकडे वळतो त्यावर विजयाची निश्चिती ठरवता येते. पोवार समाज हा परंपरेने भाजपचा मतदार आहे तर तेली समाज सर्वच पक्षीय आहे.
विकास फाऊंडेशनचे संस्थापक माजी आमदार चरण वाघमारे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा हे कार्यकर्ते ठरवतील, असे सांगून त्यांनी समर्थनाबाबत अद्याप घोषणा केली नाही. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर लढतीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.