संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : कृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ खरेदी विक्री महासंघाच्या निवडणुकांमधील यशानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात नवसंजीनवी प्राप्त झाली आहे. नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला आहे.

दोन बाजार समित्यांसह मेहकर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील दणदणीत विजयाचा जल्लोष खासदार प्रताप जाधव, आ. संजय रायमूलकर यांनी नुकताच साजरा केला. अगदी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरत विरोधकांना उद्देशून त्यांनी दंड थोपटले. मात्र, सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपूर्ण जिल्ह्यात शिंदे गटाला बळ मिळाले.

आणखी वाचा-अपात्रता याचिकांवर तातडीने निर्णय घ्यावा, ठाकरे गटाची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

शिवसेनेतील बंडखोरीच्या ‘बुलढाणा कनेक्शन’चा इतिहास तसा जुनाच. नव्वदीच्या दशकात बुलढाणा आणि जळगावचे तत्कालीन आमदार अनुक्रमे राजेंद्र गोडे व कृष्णराव इंगळे यांनी बाळासाहेब ठाकरेंची दहशत झुगारून बंडखोरी केली. अनेक दिवस ते ‘गायब’ राहिले. याची जनतेत उलट प्रतिक्रिया उमटली. गोडे नंतर कायम माजी आमदारच राहिले. इंगळेंची लोकप्रियता घसरत गेली. याचा फायदा घेत भाजपचे संजय कुटे यांनी जळगावावर आपले वर्चस्व निर्माण केले. बुलढाणा मतदारसंघात सतत अयशस्वी लढत देणारे संजय गायकवाड पहिल्यांदाच २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. अडीच वर्षांतच झालेल्या बंडखोरीत सहभागी होऊन त्यांनी मोठी राजकीय जोखीम पत्करली. सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले मेहकरचे संजय रायमूलकर यांनीही आपली दीर्घ कारकीर्द पणाला लावली. त्यांचे सूत्रधार खा. जाधव यांनी योग्यवेळी शिंदे गटात जात हा धोका पत्करला. त्यांच्या पाठबळाने अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांनी दशकांची निष्ठा त्यागून बंडखोरीचे निशाण हाती घेतले. मात्र, जनमानसांतील संतप्त प्रतिक्रिया व बाजार समितीचे निकाल त्यांना धक्का देणारे ठरले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर ते धास्तावले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनुकूल निकाल दिल्याने खा. जाधव, आ. रायमूलकर आणि आ. गायकवाड यांना दिलासा मिळाला आणि शिंदे गटाला नवसंजीवनी मिळाली.