बुलढाणा : भाजपकडून जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मलकापूर मतदारसंघातील उमेदवार मात्र जाहीर करण्यात आला नसल्याने तेथील गुंता कायम असल्याचे स्पष्ट झाले.
चिखली मतदारसंघातून आमदार श्वेता महाले, खामगाव विधानसभा मतदारसंघातून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघातून भाजपने डॉ.संजय कुटेंना उमेदवारी जाहीर केली आहे. कुटे २००४ पासून सलग चारवेळा निवडून आले आहे. फुंडकर यांनी दोनदा विजय मिळवला आहे. मागील लढतीत प्रथमच विजयी झालेल्या चिखलीच्या आमदार महाले दुसऱ्यांदा भाग्य आजमावणार आहे.
आणखी वाचा-ठाण्यात संजय केळकर यांच्याकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न
भाजपच्या वाट्यावर असलेल्या मलकापूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. भाजपमध्ये असलेली गटबाजी, माजी आमदार चैनसुख संचेती विरुद्ध शिवचंद्र तायडे गटात बाजार समितीवरून झालेला संघर्ष, इच्छुकांची मोठी यादी, आदी कारणांमुळे येथील उमेदवाराची घोषणा दुसऱ्या यादीत करण्यात येईल, असे वृत्त आहे. तूर्तास दोन जागा नक्की असलेल्या शिंदे गटाची यादी उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाचे हे धोरण असल्याचे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले.
बुलढाणामधून संजय गायकवाड आणि मेहकरमधून संजय रायमूलकर यांच्या नावाची घोषणा औपचारिकताच आहे. मात्र, सिंदखेड राजाचे आमदार शरद पवार गटात गेल्याने ते आघाडीचे उमेदवार राहणार आहे. तिथे शिंदे गटाने दावा केला असून माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना संधी मिळते का, हे पाहणे मजेदार ठरणार आहे. कारण, अजित पवार या जागेसाठी आग्रही आहेत. ही एकमेव जागा ते सहजासहजी सोडणार नाही.