काँग्रेसने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांच्या तुलनेत अतिशय नवख्या नेत्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आश्चर्य व्यक्त केलेल्या नेत्यांमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सतेज पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यासारख्या तरूण काँग्रेस नेत्यांनाही हे स्वीकारणे कठीण असल्याचे कळते. विशेषतः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा या आव्हानात्मक टप्प्यावर काँग्रेस पक्षाला पुनरुज्जीवित करू शकेल, अशा आक्रमक नेत्याची निवड करायला हवी होती, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.

हर्षवर्धन सपकाळ २०१४ ते २०१९ पर्यंत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. याव्यतिरिक्त सपकाळ राज्यात फारसे सक्रिय दिसले नव्हते. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, “मागच्या पाच वर्षांत सपकाळ यांनी पक्षाची भूमिका मांडलेली ऐकिवात नाही. २०१९ नंतर अडीच वर्षांसाठी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सत्तेत होता, यावेळीही सपकाळ कुठेच दिसले नाहीत. तसेच जेव्हा भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, तेव्हाही पक्षाचे मनोबल उंचावण्यासाठी सपकाळ पुढे आले नाहीत.”

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेसने माझ्याशी संपर्क साधला होता. पण तरूण नेत्याकडे ही जबाबदारी देण्यात यावी, असे मी सांगितले. पण जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. कारण त्यांचे नाव चर्चेतही नव्हते. मला वाटले होते, कोल्हापूरचे सतेज पाटील या पदावर येतील. आम्ही सतेज पाटील यांचे नाव पक्षश्रेष्ठींना कळवले होते. सतेज पाटील यांनी कदाचित प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिला असावा.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, सपकाळ यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असतानाच महाविकास आघाडीमधील पक्षांशी समन्वय ठेवावा लागणार आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. जर प्रस्थापित नेत्यांनी हे पद घेण्यास नकार दिला असेल तर पक्षासमोर फारसा पर्याय उरलेला नाही. आमच्यासाठी आता हा विषय संपला आहे. सपकाळ पुढे कसे काम करतात, हे पाहू.

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सतेज पाटील या निर्णयामुळे नाराज असल्याची चर्चा होती. पण त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत नाराजी असल्याची चर्चा फेटाळून लावली. ते म्हणाले, “पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे. सपकाळ हे उत्तम संघटक आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून पुढे नेण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य त्यांच्याकडे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ते एक तटस्थ व्यक्ती असून त्यांच्यावर भूतकाळात कोणतेही आरोप झालेले नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्व साधे असून त्यांनी जिल्हा परीषद अध्यक्ष आणि आमदार म्हणून काम केले आहे. तसेच ते सर्वांना उपलब्ध होतील. ते सकाळी ९ वाजता पक्ष कार्यालयात येतात आणि रात्रीपर्यंत सर्वांना भेट देतात.”

सतेज पाटील पुढे म्हणाले की, त्यांना संबंध महाराष्ट्रातून नेते आणि कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. मी प्रदेशाध्यक्ष पद का घेतले नाही, अशी विचारणा केली जात आहे. खरे सांगायचे तर चार वर्ष हे पद सांभाळणे माझ्यासाठी कठीण होते. मी फार फार तर दोन वर्ष पद सांभाळू शकलो असतो. त्यामुळे मी माघार घेतली. आज पक्षाचे पुनरुज्जीवन करणे, ही प्राथमिकता आहे. सपकाळ यांनी नवीन कार्यकर्त्यांना जोडण्यावर लक्ष केंद्रीत केले. तसेच जिल्ह्यांना भेटी देऊन पक्ष नेत्यांमधील मतभेद दूर केले तरी ते पक्षाला पुनरुज्जीवित करण्यात यशस्वी होतील.

सतेज पाटील यांनी यावेळी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी पक्ष उभारणीसाठी आपला वेळ दिला, शक्ती खर्च केली. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी ते कायम उपलब्ध असत. त्यांच्याकडून कधी कधी वादग्रस्त विधाने झाली असतील पण जेव्हा जेव्हा पक्षासाठी लढण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा ते आघाडीवर होते. मी त्यांना पक्ष कार्यकर्त्यांशी पहाटेपर्यंत संवाद साधताना पाहिले आहे. कधी कधी साधे वाटणारे नेतेही पक्षाला एक मोठी उंची गाठून देतात. त्यामुळेच सपकाळ काँग्रेसला पुन्हा यश मिळवून देतील, अशी आम्हाला आशा आहे.”

सांगलीचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले, सपकाळ यांच्या निवडीमुळे मी नाराज नाही. मुळात मी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतच नव्हतो. सपकाळ यांच्या निवडीचे कारण विचारले असता ते म्हणाले की, याचे कारण तुम्ही पक्षालाच विचारा.

काँग्रेसचे आणखी एक नेते सचिन सावंत म्हणाले की, सपकाळ हे अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. ते एनएसयुआयचे अध्यक्षही होते. पक्षाने त्यांना पद देत असताना सर्व पैलूंचा नक्कीच विचार केला असेल. मला वाटते पक्षाच्या कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची संधी देऊन पक्षाने एक चांगला निर्णय घेतला आहे. तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, पक्षाने योग्य निवड केली आहे. सपकाळ पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे. तसेच ते पंचायती राज संघटनेचे उपाध्यक्षदेखील आहेत.

Story img Loader