Congress offer CM post to Shinde-Ajit Pawar: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या आघाडीशी हातमिळवणी केल्यास दोघांनाही आळीपाळीने मुख्यमंत्री बनण्याची संधी देऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. महायुतीमध्ये उभय नेत्यांची घुसमट होत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, “महायुती आणि फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्थिती काही ठिक नाही. त्यांची तिथे घुसमट होत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो. दोघांनाही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. आम्ही त्यांना आळीपाळीने मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. भाजपा या दोन नेत्यांना कधीही मुख्यमंत्री होऊ देणार नाही.” धुलिवंदनाच्या दिवशी नाना पटोले यांनी हे भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे विधान केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मुख्यमंत्री फडणवीस घेत असलेल्या निर्णयांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने घेतलेले निर्णय आणि प्रस्तावित प्रकल्पांना स्थगिती दिल्याची चर्चा आहे. तसेच नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीवरूनही महायुतीत वाद असल्यामुळे शिंदे नाराज असल्याचे सांगितले जाते.

नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या दिवशी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर महायुतीमधील नेते एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यांनी नाना पटोले यांनाच सत्ताधारी महायुतीत सामील होण्याचे आवाहन केले. तर महाविकास आघाडीतील नेते, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या विधानाला पाठिंबा दिला.

काँग्रेसकडून शिंदे यांचे कौतुक

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राजकारणात कुणीही कायमचा शूत्र किंवा मित्र नसतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे काम करण्याची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच २०२२ साली ते शिवसेनेला फोडून स्वतःचा पक्ष स्थापन करू शकले. पण ज्यापद्धतीने त्यांना आता महायुतीमधून बाजूला फेकले गेले आहे, ते फारच निराशाजनक आणि दुःखद आहे. त्यामुळे नजीकच्या काळात राज्यातील राजकारणात उलटफेर होण्याची शक्यता आहे. जर कुणाचा आत्मसन्मान दुखावला गेला असेल तर त्याने जरूर निर्णय घेतला पाहिजे.

राजकारणात सर्व काही शक्य – संजय राऊत

संजय राऊत यांनीही राजकारणात काहीही होऊ शकते, अशी शक्यता वर्तविली. संजय राऊत म्हणाले की, २०१९ साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा कुणी विचार तरी केला होता का? त्यानंतर पुन्हा अडीच वर्षांनी राज्यात घटनाबाह्य सरकार स्थापन होईल, हाही विचार कुणी केला नव्हता. तसेच २०२४ ला देवेंद्र फडणवीस इतक्या मोठ्या बहुमताने निवडून येतील, असेही कुणाला वाटले नव्हते. राजकारणात सर्व काही शक्य असते.

“महायुतीमध्ये पडद्याआड जे काही चालले आहे, त्याचाच संदर्भ नाना पटोले यांनी दिला असल्याचेही संजय राऊत म्हणाले. महायुतीमधील संघर्ष अचानक स्पष्टपणे दिसू लागला आहे. नाना पटोले यांनी उलट लवकर घंटा वाजवली, त्यांनी थोडा वेळ थांबायला हवे होते. वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात बरेच बदल होणार आहेत”, असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader