अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना आशिष शेलार यांची जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती करून भाजपने वेगळीच खेळी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही घटक पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात वादंग उभा राहीला. शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. टायर्स जाळून निदर्शने केली. आदिती तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. शिवसेनेचे जिल्ह्यातील तिनही आमदार तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या वादानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदी झालेल्या नियुक्तीला तातडीने स्थगिती देण्यात आली. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून हा वाद सोडवतील असे जाहीर करण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत या वादावर तोडगा निघु शकलेला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळू शकलेला नाही.

या वादावार मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या वर्षवेध कार्यक्रमात बोलतांना भाष्य केले होते. पालकमंत्री पदावर चर्चेतून तोडगा काढला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली होती. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. त्यामुळे सर्वच पक्ष हे पद आपल्या पक्षाकडे रहावे यासाठी आग्रही असतात. ज्या जिल्ह्यात घटक पक्षातील सर्वच पक्षांची ताकद असते, तिथे ते पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही असतात. त्यामुळे हा वाद चर्चेतून मिटवला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय प्रलंबित असपुतांनाच भाजपने रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती पक्षपातळी पुरती मर्यादीत असली तरी यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते. मात्र भाजपचे तीन आमदार असूनही एकाही आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागू शकली नव्हती. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. ही बाब लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या जिल्ह्यात सहयोगी पक्षांचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात भाजपचे संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत. कार्यकर्त्यांना सत्तेचे पाठबळ मिळावे यासाठी पक्षाने टाकलेले पाऊल असल्याचे सागितले जात आहे.