मुंबई : ‘अबकी बार, ४०० पार’च्या घोषणा महायुतीने दिल्या असल्या तरी मुंबई-ठाणेसह काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. दक्षिण मुंबई मतदारसंघातून जावई आणि विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळावी, असा आग्रह माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धरला आहे. तरच माढ्यातील भाजप उमेदवार व खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांना सहकार्य करण्याची भूमिका रामराजे नाईक-निंबाळकर यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दक्षिण, उत्तर मध्य आणि वायव्य मुंबई, ठाणे, नाशिक या मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही. पीयूष गोयल निवडून आल्यावर त्यांची राज्यसभेची रिक्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याच्या बदल्यात सातारा लोकसभा मतदारसंघाचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने मागे घेतला आहे.
दक्षिण मुंबईची शिवसेनेची जागा शिंदे गटाला हवी आहे. या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार निवडून येणार नसल्याचा सर्वेक्षणाचा दाखला देत भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. येथून लढण्यासाठी नार्वेकर यांच्याबरोबरच कँबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही जनसंपर्क व प्रचारास सुरुवात केली आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाचा बालेकिल्ला असल्याने येथे मराठी उमेदवार असावा, अशी महायुतीतील काही नेत्यांची भूमिका आहे. दक्षिण मुंबई भाजपला दिल्यास भाजपने ठाण्यावरील दावा मागे घ्यावा, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. मात्र भाजप त्यास तयार नसून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात नुकतेच नवीन कार्यालयही सुरू केले. संजीव नाईक यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न चालविले असून प्रचारही सुरू केला आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा पूनम महाजन यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप विचार करण्याची शक्यता खूपच कमी आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनाच ऐनवेळी उमेदवारी जाहीर होईल, अशी शक्यता आहे. काँग्रेसमधील मुंबईतील एका ज्येष्ठ नेत्याला भाजपकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव असला तरी हा नेता भाजपमध्ये येण्यास उत्सुक नाही, असे सूत्रांनी सांगितले. अभिनेते सचिन खेडेकर यांचे नाव उत्तर मध्य किंवा वायव्य मुंबईसाठी चर्चेत आहे. सर्वेक्षण अहवालाचा आधार घेत भाजप शिवसेनेची एक एक जागा काबीज करीत असून शिंदे गटावरील दबाव वाढवून निवडणुकीच्या टप्प्यानुसार उमेदवारी घोषित करण्यात येत आहे.