२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’च्या रुपात आघाडी केली आहे. या आघाडीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश आहे. या निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करणारच असा विश्वास विरोधक व्यक्त करत आहेत. विरोधकांच्या याच मुद्द्यावरून मोदी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यलढ्यातील ‘क्विट इंडिया (भारत छोडो)’ आंदोलनाचा दाखला देत विरोधकांवर हल्लाबोल केला होता. दरम्यान मोदी यांच्या या टीकेला राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
“नरेंद्र मोदीच आता देश सोडून जाण्याचा विचार करत आहेत”
नरेंद्र मोदी यांना २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तेच भारताच्या बाहेर जाऊन वास्तव्य करणार आहेत, असा टोला लालूप्रसाद यादव यांनी लगावला. “नरेंद्र मोदीच भारत सोडून जाण्याचा विचार करत आहेत. याच कारणामुळे ते अनेक देशांच्या भेटी घेत आहेत. पिझ्झा, मोमोज यासारख्या पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता यावा, असे ठिकाण ते राहण्यासाठी शोधत आहेत,” अशी कोपरखळी लालूप्रसाद यादव यांनी मारली.
नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
तीन दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर सडकून टीका केली. विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असे आहे. याच इंडिया नावाचा संदर्भ घेत त्यांनी जनतेने ‘क्विट इंडिया’ची मोहीम पुन्हा एकदा राबवायला पाहिजे, असे विधान केले. स्वतंत्र्यलढ्यातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचा संदर्भ देत मोदी यांनी ही टीका केली होती.
आज भारताला क्विट इंडियाची गरज- नरेंद्र मोदी
“स्वतंत्र्यलढ्याच्या चळवळीला जेव्हा चांगलीच गती मिळाली होती, तेव्हा महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ म्हणजेच भारत छोडोची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे देशातील लोकांना प्रेरणा मिळाली होती. आज देशाच्या कल्याणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी या घोषणेची पुन्हा एकदा गरज आहे. या घोषणेला गावकुसापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. इंग्रजांनो भारत सोडून जा, असे महात्मा गांधी तेव्हा म्हणाले होते. अशाच प्रकारे आजदेखील भ्रष्टाचार क्विट इंडिया, घराणेशाही क्विट इंडिया, अशी घोषणा देण्याची गरज आहे. क्विट इंडियाच भारताला आज वाचवू शकेल,” असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. विरोधकांच्या ‘इंडिया’ नावाने समोर आलेल्या आघाडीला पराभूत करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी केला होता.