महिलांना लोकसभा आणि विधानसभांत ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकावर शुक्रवारी (२९ सप्टेंबर) राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. या विधेयकाला राज्यसभा आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांत एमआयएम वगळता सर्वच पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. मात्र, विरोधकांनी या विधेयकात अनेक दुरुस्त्या सुचवल्या आहेत. महिलांच्या ३३ टक्के आरक्षणामध्ये ओबीसी महिलांसाठी विशेष कोटा असावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. असे असतानाच राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षाचे नेते तथा बिहारचे माजी मंत्री अब्दुल बारी सिद्दीकी यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. या विधेयकात असलेल्या सध्याच्या तरतुदींचा फायदा फक्त लिपस्टिक आणि बॉबकट असलेल्या महिलांनाच होईल, असे सिद्दीकी म्हणाले आहेत. सिद्दीकी यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्दीकी नेमकं काय म्हणाले?

सिद्दीकी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) मुझफ्फरपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. राजदच्या ईबीसी शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बोलताना “महिलांसाठीच्या ३३ टक्के आरक्षणाचा फायदा ईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांना मिळाला, तरच या आरक्षणाचा फायदा होत आहे, असे म्हणावे लागेल. अन्यथा, लिपस्टिक आणि बॉबकट असलेल्या स्त्रियाच या आरक्षणाचा फायदा घेतील,” असे सिद्दीकी म्हणाले. महिला आरक्षणाबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राजद पक्ष करतो विभाजन, फुटीचे राजकारण!

सिद्दीकी यांच्या या विधानानंतर भाजपाने राजद पक्ष, तसेच विरोधकांच्या इंडिया या आघाडीवर सडकून टीका केली. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरू प्रकाश पासवान यांनी सिद्दीकी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. “सिद्दीकी यांच्या विधानातून राजद पक्षाची पितृसत्ताक, जुनी मानसिकता दिसून येते. अनेक वर्षांपासून राजद पक्षात एकही महिला चांगली नेता म्हणून समोर का येऊ शकली नाही? राजद हा पक्ष विभाजन आणि फुटीचे राजकारण करतो आहे. सिद्दीकी हे त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी हार्वर्डमध्ये पाठवतात; तर दुसरीकडे महिलांना अधिकार देण्यास ते अनुकूल नाहीत,” अशी टीका पासवान यांनी केली.

“इंडिया आघाडीकडून सिद्दीकी यांचे समर्थन केले जात आहे का?”

भाजपाचे दुसरे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीदेखील सिद्दीकी, तसेच इंडिया आघाडीवर टीका केली. सिद्दीकी यांच्या विधानावर काँग्रेस किंवा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया का दिली नाही, असा सवालही त्यांनी केला. “काँग्रेस किंवा इंडिया आघाडीतील अन्य कोणत्याही पक्षाने सिद्दीकी यांच्या विधानाचा निषेध केलेला नाही. म्हणजेच ते सर्व जण सिद्दीकी यांच्या विधानाशी सहमत आहेत. याआधी आपण संसदेत समाजवादी पार्टी आणि राजद पक्षाचे नेते महिला आरक्षण विधेयकाच्या प्रती फाडताना पाहिलेले आहेत,” असे पूनावाला म्हणाले. सिद्दीकी यांच्या विधानाची तुलना जनता दलाचे माजी खासदार शरद यादव यांच्या विधानाशी केली जात आहे. १९९७ साली शरद यादव यांनी फक्त ‘परकटी’ महिलांनाच महिला आरक्षणाचा फायदा होत आहे, असे विधान केले होते. उच्च जातीय, उच्च वर्गीय महिलांना उद्देशून शरद यादव यांनी ‘परकटी’ हा शब्द उच्चारला होता.

राजद पक्षाने केली पाठराखण

सिद्दीकी यांच्या विधानावर भाजपाने टीका केली असली तरी राजद पक्षाच्या नेत्यांनी सिद्दीकी यांची पाठराखण केली आहे. राजद पक्षाचे प्रवक्ते सुबोधकुमार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “सिद्दीकी हे ग्रामीण भागातील लोकांना संबोधित करीत होते. यावेळी बोलताना त्यांनी लिपस्टिक आणि केसांचा बॉबकट असा उल्लेख केला. सोप्या भाषेत समजून सांगता यावे म्हणून त्यांनी तसा उल्लेख केला. ते ज्येष्ठ नेते आहेत. समाजवादी विचार असलेल्या कर्पुरी ठाकूर यांच्यासोबत त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी केलेल्या विधानाकडे व्यापक संदर्भाने पाहिले पाहिजे. त्यांनी केलेले भाषण हे पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत होते,” असे सुबोधकुमार म्हणाले.

सिद्दीकी यांनी दिले स्पष्टीकरण

भाजपाकडून टीका झाल्यानंतर या विधाबाबात सिद्दीकी यांनी स्पष्टीकरण दिले. “मी ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधत होतो. त्यामुळे मी लिपस्टिक आणि बॉबकट, असा संदर्भ देत महिला आरक्षण हे ओबीसी आणि ईबीसी वर्गातील महिलांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे, हे सांगत होतो. माझ्या शब्दांमुळे कोणाला वाईट वाटले असेल, तर मी माफी मागतो,” असे सिद्दीकी म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rjd leader abdul bari siddiqui comment on womens reservation bill bjp criticizes prd