सुजित तांबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पवार कुटुंबामध्ये दुही निर्माण झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाची अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून भूमिका मांडत असताना आमदार रोहित पवार यांनी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढून राज्यातील युवकांचे उभरते नेतृत्त्व अशी प्रतिमा निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. या संघर्ष यात्रेचा आरंभ पुण्यातून होणार असून, रोहित यांना साथ देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दसऱ्याच्या दिवशी जाहीर सभा घेऊन सीमोल्लंघन करणार आहेत. त्यामुळे लोक सांगाती असतीलच, पण ‘आजोबा नातवाच्या सांगाती’ असा संदेश दिला जाणार आहे.अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात संघर्ष सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अजित पवार यांचा आजवरचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये रोहित पवार यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर हा संघर्ष पेटू लागला आहे.

आता रोहित पवार हे युवकांचे प्रश्न हाती घेऊन राज्य सरकारच्या कारभारावर टीका करू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘युवा संघर्ष यात्रा’ काढून राज्यभर दौरा करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा आरंभ पुण्यात मंगळवारी, २४ ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. लाल महालापासून या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर टिळक स्मारक मंदिर येथे शरद पवार हे जाहीर सभा घेणार आहेत. तसेच ते युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ही यात्रा नागपूरच्या दिशेने जाणार आहे. या निमित्ताने आजोबा नातवाच्या सांगाती असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

हेही वाचा >>>धर्मांतरितांना आरक्षित संवर्गातून वगळण्यासाठी भाजपची मोहीम, नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचा रविवारी मेळावा

४५ दिवस ८०० किलोमीटर पायी प्रवास

युवकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार हे सलग ४५ दिवस सुमारे ८०० किलोमीटरचा प्रवास पायी करणार ओहत. या यात्रेदरम्यान ते विविध ठिकाणी युवकांशी संवाद साधणार आहेत. नागपूरला यात्रेची सांगता झाल्यानंतर युवकांनी केलेल्या मागण्यांकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत.या यात्रेबाबत रोहित पवार म्हणाले, ‘रथयात्रेसारखी ही यात्रा असणार नाही. प्रत्यक्ष पायी जाऊन युवकांना भेटणार आहे. त्यातून समस्या जाणून घेणार आहे’

हेही वाचा >>>१९८४ नंतर पहिल्यांदाच शीखबहुल भागात काँग्रेसची सभा; काय असेल काँग्रेसची रणनीती ?

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मागण्या

आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विदयार्थांचे प्रश्न या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित केले आहेत. हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे. राज्यसेवा २०२४ जाहिरात ही एक हजार जागांची करण्यात यावी, यूपीएससीचे मुख्य परीक्षा केंद्र मुंबईबरोबरच पुण्यात करण्यात यावे, रखडलेल्या नियुक्त्या तातडीने कराव्यात, प्रलंबित भरती प्रक्रियेला गती द्यावी, परीक्षा शुल्क वसुली थांबवावी, पेपरफुटीविरोधात कडक कायदा करण्यात यावा आदींचा समावेश आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar yuva sangharsh yatra will start from pune public meeting of sharad pawar on dussehra to support rohit print politics news amy