गुजरातमधल्या पायाभूत सुविधांसाठी १२,६०० कोटी देणार; नितीन गडकरींची घोषणा
गुजरातमधल्या अहमदाबाद-ढोलेरा द्रुतगती मार्गासाठी जी कामांची पाहणी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच बुधवारी नितीन गडकरी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राज्यात सुरू असलेल्या महामार्ग प्रकल्पांविषयी उच्चस्तरीय बैठक घेतली होती.
वार्षिक योजनांच्या अंतर्गत आम्ही गुजरातला २६०० कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी देऊ. राज्य महामार्ग, जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील रस्ते बांधण्यासाठी ३ हजार कोटी रूपये दिले जातील. तर सेतू बंधन योजनेसाठी १ हजार कोटी रूपये दिले जातील असंही नितीन गडकरींनी सांगितलं आहे. मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी ६ हजार कोटी रूपयांची तरतूद करणार आहोत. गुजरातला पायाभूत सुविधांसाठी १२ हजार ६०० कोटींचा निधी देण्याची घोषणा नितीन गडकरींनी केली आहे.
आम्ही १०९ किलोमीटर लांबीचा अहमदाबाद धोलेरा द्रुतगती मार्ग बांधत आहोत. या महामार्गामुळे अहमदाबाद धोलेरा या स्मार्ट सिटीशी जोडलं जाईल. जानेवारी २०२४ पर्यंत हे काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. या महामार्गाचं काम २०२१ मध्ये सुरू झालं आहे. या महामार्गाचं काम आत्तापर्यंत २१ टक्के पूर्ण झालं आहे असंही एका अधिकृत पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे.
नितीन गडकरी यांनी आणखी काय सांगितलं?
नितीन गडकरी यांनी पत्रकारांना सांगितलं की अहमदाबाद महापालिका हद्दीत निर्माण होणारा २० लाख मेट्रिक टन घनकचरा आणि औष्णिक उर्जा प्रकल्पाद्वारे तयार होणारी २५ लाख मेट्रिक टन राख महामार्गाचा पाया रचण्यासाठी आम्ही वापरत आहोत. एवढंच नाही तर महामार्गाच्या बांधणीसाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर माती लागणार आहे. त्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही प्रस्ताव दिला आहे की राज्यातले कालवे आणि तलाव हे आम्ही विनामूल्य खोदून देतो. त्यातली माती आम्हाला द्या. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ती मातीही महामार्गासाठी वापरली जाईल असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.