नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ऐन निवडणूकीत केलेले विधान व त्यावरुन संघात निर्माण झालेली अस्वस्थता याला ‘कौटूंबिक बाब’ अशी उपमा देत तसेच जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावर स्पष्ट भूमिका घेत संघाने आज भाजपने अंगीकारलेल्या कार्यपद्धतीत बदल करा असा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी आज केरळमध्ये मांडलेल्या भूमिकेमुळे निवडणूकीच्या काळात संघ व भाजपमध्ये समन्वयाचा अभाव होता असेही दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भाजप आता स्वयंपूर्ण झाला. त्यामुळे संघाच्या मदतीची गरज नाही’ असे विधान नड्डांनी लोकसभा निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी केले होते. ही कृती ठरवून होती व त्याला सरकार व पक्ष चालवतांना संघाचा हस्तक्षेप नको या मोदींनी गुजरातपासून राबवलेल्या धोरणाचा संदर्भ होता असे तेव्हा बोलले गेले होते. त्याशिवाय संघाच्या मदतीशिवाय तीनशेचा टप्पा पार करु असा अतिआत्मविश्वास त्यामागे होता. तो खरा ठरल्याचे निकालातून सिद्ध झाल्यावर सरसंघचालक मोहन भागवतांनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात ‘अहंकारा’वर कठोर भाष्य केले होते. या पार्श्वभूमीवर केरळमधील पल्लकडला पार पडलेल्या समन्वय बैठकीनंतर संघाने केलेले भाष्य बरेच काही सांगून जाणारे आहे.

हे ही वाचा… जातीनिहाय जनगणनेसाठी संघ अनुकूल; राजकारणासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा

नड्डांचे तेव्हाचे वक्तव्य संघातील अनेकांना रुचले नव्हते. मात्र, त्याचा थेट प्रतिवाद न करता कृतीतून उत्तर देण्याचे धोरण त्यानंतर लगेच अंमलात आणले गेले. भागवतांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीची घेतलेली भेट, महाराष्ट्रात लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्याबरोबर संघाच्या वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सुरू केलेली चर्चा, नंतर फडणवीस व भागवत यांच्यात झालेली भेट हे सारे या धोरणाचा भाग होते. दिल्लीतील नेते काहीही म्हणोत आम्हाला मात्र निवडणूकीतील यशासाठी संघाची गरज आहे असाच संदेश या भेटीतून सर्वत्र गेला. लोकसभेत जे झाले ते झाले, पण राज्यांच्या निवडणूकांमध्ये संघ सक्रीय असेल असा संदेश या घडामोडीतून दिल्लीतील सत्तावर्तुळाला देण्यात आला.

समाजकारण करतांना अथवा वैचारिक अनुकूलतेच्या राजकारणात अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवतांना चर्चा व समन्वयावर संघाकडून नेहमी भर दिला जातो. अलीकडच्या काही वर्षात दिल्लीतील वर्तुळात यातले काहीच घडत नव्हते. एक-दोघांनी निर्णय घ्यायचे व साऱ्यांनी ते मान्य करायचे अशी नवीन पद्धत सुरू झाली होती. अर्थात संघाला ती मान्य नव्हती. त्यातून लोकसभेच्या वेळी संघाची सक्रीयता फारशी दिसली नाही. त्याला प्रत्युत्तर देण्याचा भाग म्हणून नड्डाचे वक्तव्य आले. या पार्श्वभूमीवर आता संघाने पुन्हा एकदा सक्रीयता दाखवत ‘एकचलानुवर्ती’ राजकारण चालणार नाही असा संदेशच दिला आहे. आंबेकर यांनी यावर ‘व्यवस्थापनात्म्क त्रुटी’ असा शब्दप्रयोग वापरला असला तरी या त्रुटी कुणामुळे निर्माण झाल्या. कुणाचा दुराग्रह, हट्ट व अहंकार यासाठी कारणीभूत ठरला याची पूर्ण कल्पना या परिसरातील सर्वांना आहे.

हे ही वाचा… भाजपकडून प्रतिसादाची खडसे यांना प्रतीक्षा

महाराष्ट्रात येत्या विधानसभेच्या निवडणूका सामूहीक नेतृत्त्वाच्या आधारावर लढल्या जातील ही घोषणा सुद्धा संघाच्या सध्याच्या सक्रीयतेचे गमक आहे. ‘राष्ट्रप्रथम’ या संघाच्या धोरणात व्यक्तीला महत्त्व नाही. संघाच्या रचनेत सुद्धा व्यक्तीमहात्म्याला कधीच स्थान नसते. नेमका त्याचाच अभाव भाजपमध्ये अलीकडच्या काही वर्षात ठळकपणे दिसू लागला होता. तो समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने संघाने आता पावले टाकायला सुरुवात केल्याचे आंबेकरांच्या विधानांमधून स्पष्टपणे ध्वनित होते. हा ‘कौटुंबिक मुद्दा’ सोडवताना संघ वरचढ राहील याचीही काळजी मोठ्या चतुराईने घेण्यात आल्याचे यातून दिसते.

यातला दुसरा मुद्दा आहे तो जातनिहाय गणनेचा. कधीकाळी संघाला जात ही संकल्पनाच मान्य नव्हती. समाजात रुजलेले जातीवास्तव पुसून काढण्यासाठी संघाने सामाजिक समरसतेचा नारा दिला. त्यावर बरेच कामही केले. मात्र सध्या देशातली स्थिती जात व आरक्षण या मुद्यावरुन कमालीची स्फोटक बनत चालली आहे. त्याचे प्रतिबिंब आंबेकरांच्या आजच्या विधानात दिसून आले. अशी गणना ही हिंदुंमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे या भाजपने घेतलेल्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध मत आज संघाने मांडले. अशा गणनेचा राजकीय फायदा कुणी घेऊ नये, कल्याणकारी योजनांसाठी याचा वापर व्हावा असे संघाने म्हटले असले तरी प्रत्यक्षात याचे राजकारणच होणार याची पूर्ण कल्पना संघाच्या धुरिणांना आहे. तरीही वास्तवाला सामोरे जायचे असेल तर असे धाडस दाखवण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्यानेच हे पाऊल उचलल्याचे आता बोलले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss advised bjp about policy change print politics news asj