RSS Linked ‘Panchjanya’ Weekly: भाजपा खासदार व माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोन आठवड्यांपूर्वी संसदेत केलेलं एक विधान देशभर चर्चेत आलं होतं. काँग्रेसकडून लोकसभेतच ठाकूर यांच्या त्या विधानाचा निषेधही करण्यात आला. जातीआधारित जनगणनेच्या मागणीचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात केला होता. त्यानंतर अनुराग ठाकूर यांनी “ज्यांची स्वत:ची जात माहिती नाही, ते जातीआधारित जनगणनेवर बोलत आहेत”, असं अनुराग ठाकूर यांनी म्हणताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या मुद्द्यावरून दावे-प्रतिदावे होत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ साप्ताहिकानं थेट आपल्या संपादकीयामध्ये देशातील जातीव्यवस्थेचं समर्थन केलं आहे!

‘जात म्हणजे देशाला जोडणारा घटक’

एकीकडे ‘जी जात नाही ती जात’, हा वाक्प्रचार अजूनही वास्तव मांडताना वापरला जात असताना दुसरीकडे ‘पांचजन्य’मधील अग्रलेखातून जातीचं समर्थन करण्यात आलं आहे. ‘जात हा भारताला जोडणारा घटक आहे. मुघलांना ही गोष्ट समजली नाही, पण ब्रिटिशांना जात म्हणजे भारतातील त्यांच्या घुसखोरीमधील मोठा अडथळा वाटली होती’, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

Pimpri Legislative Assembly, Anna Bansode, Shilwant Dhar
पिंपरी विधानसभा : अखेर ठरलं, अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या शिलवंत-धर यांच्यात लढत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Pune Municipal Corporation has taken important decision for success of river improvement scheme
नदी सुधार योजनेच्या यशासाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय, अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
Mahavikas Aghadi News
MVA News : महाविकास आघाडीत पहिली ठिणगी? ‘हा’ पक्ष वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?
28 nominations filed for eight seats in Solapur
सोलापुरात आठ जागांसाठी २८ उमेदवारी अर्ज दाखल
MVA PC About Seat Sharing
MVA : “२७० जागांवर आमचं एकमत, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार..”, नाना पटोलेंनी काय सांगितलं?
MPSC Mantra  Administrative System State Services Main Examination career news
MPSC मंत्र : प्रशासकीय व्यवस्था; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन
SSC Students News
SSC : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?

“देशातील कामाचं स्वरूप आणि परंपरांवर आधारित वेगवेगळ्या गटांना एकत्र बांधणारी साखळी म्हणून जातीकडे पाहिलं जात होतं. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाहांनी जातीव्यवस्थेकडे भारताचं संरक्षण करणारा घटक म्हणून पाहिलं”, असं या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. ‘पांचजन्य’ साप्ताहिकाचे संपादक हितेश शंकर यांनी जातीसंदर्भातली सविस्तर भूमिका अग्रलेखात मांडली आहे.

घुसखोरांसाठी जातीव्यवस्था प्रमुख लक्ष्य

भारतातील जातीव्यवस्था ही घुसखोरांसाठी प्रमुख लक्ष्य होती, असं हितेश शंकर यांनी अग्रलेखात म्हटलं आहे. “मुघलांनी जातीव्यवस्थेवर तलवारीनं वार केले, तर ख्रिस्ती मिशनरींनी सेवा व सुधारणेच्या नावाखाली जातीव्यवस्थेवर हल्ला केला. जातीसंदर्भात भारतीय समाजरचनेमध्ये एक साधी-सरळ धारणा होती. एखाद्याच्या जातीचा विश्वासघात करणे म्हणजे थेट देशाचा विश्वासघात करणे. मुघलांपेक्षा ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारताला एकसंघ ठेवणारं हे समीकरण चांगलंच उपजलं होतं. जर भारताचा स्वाभिमान मोडायचा असेल, तर सर्वात आधी जातीव्यवस्थेसारख्या एकसंघ करणाऱ्या घटकावर आघात करावा लागेल हे त्यांना समजलं होतं”, असं शंकर यांनी अग्रलेखात लिहिलं आहे.

पुढे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या याच धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी त्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीसाठी केला, असा दावा यात करण्यात आला आहे.

आरक्षणविरोधी प्रतिमा पुसण्याचा संघाचा प्रयत्न

दरम्यान, समाजातील मागास घटकांसाठी आरक्षण पुरवण्याच्या विरोधात आपण नसल्याचं सातत्याने मांडण्याचा प्रयत्न गेल्या काही काळात संघाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘पांचजन्य’मध्ये छापून आलेल्या अग्रलेखाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे जातीव्यवस्थेचं मूळ कामाच्या स्वरूपावर आधारित वर्णव्यवस्थेमध्ये असल्याचा धांडोळा संघाकडून वारंवार घेतला जात असताना दुसरीकडे या व्यवस्थेतूनच समाजात पसरलेला आणि काही वर्गांवर अन्यायकारक ठरणाऱ्या जातीभेदाबाबतही संघानं भूमिका मांडली आहे. संघानं स्थापनेपासूनच स्पृश्यास्पृश्य प्रथेचा विरोध केला आहे.

सरसंघचालक मोहन भागवतांची भूमिका काय?

RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी सातत्याने जातीभेद हा भारतीय समाजव्यवस्थेच्या विनाशाला कारण ठरू शकतो अशी भूमिका मांडली आहे. जातीभेद नष्ट व्हायला हवा याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. आपल्या सहकाऱ्याची जात काय आहे हे माहिती नसल्याचं संघाचे स्वयंसेवक मोठ्या अभिमानाने सांगतात. गेल्या वर्षीच मोहन भागवत यांनी असं ठामपणे सांगितलं होतं की जर गेल्या २ हजार वर्षांपासून मागास मानल्या जाणाऱ्या जातींमधल्या लोकांना जे काही सहन करावं लागलं आहे, त्याची भरपाई करण्यासाठी आणखी २०० वर्षं आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका मांडली गेली, तर आपण त्या भूमिकेचं समर्थन करू.

जातीआधारीत कौशल्ये

दरम्यान, हितेश शंकर यांनी अग्रलेखात जातीआधारित कौशल्यांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. ‘एका जातीमधील एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे व्यवसायाधारित कौशल्ये हस्तांतरित केली जातात. त्यामुळेच, भारतातील कारागीर, उदाहरणार्थ बंगाली विणकाम कारागीरांचं काम इतकं सुबक असायचं की अगदी मँचेस्टरच्या कापड गिरणीतूनही इतकं सुबक काम होणं शक्य नाही. पण भारतातील हा परंपरागत उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त करण्याबरोबरच घुसखोरांनी भारताची ओळखच पूर्णपणे बदलून टाकली’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत कमी केली”, RSS च्य मुखपत्रातून टीका

“जेव्हा जातीआधारित गटांनी अन्यायाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. या घुसखोरांनी एका स्वाभिमानी समाजाला डोक्यावर मानवी विष्ठा वाहण्यास भाग पाडलं. त्याआधी भारतात अशा कोणत्याही परंपरेचा कुठेही उल्लेख नाही. भारतातील पीढीजात कौशल्य पाहून दु:खी होणाऱ्या डोळ्यांनीच इथल्या विविधतेला उद्ध्वस्त करण्याचं आणि हिंदू धर्माच्या पारंपारिक प्रथा नष्ट करण्याचं स्वप्न पाहिलं होतं”, असंही हितेश शंकर यांनी अग्रलेखात लिहिलं आहे.

काँग्रेसवर हल्लाबोल

दरम्यान, ‘पांचजन्य’मध्ये छापून आलेल्या लेखातून हितेश शंकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “मान, सन्मान, नैतिकता, जबाबदारी आणि सामाजिक सलोख्याने परिपूर्ण हिंदू जीवन जातींच्या अवती-भवती फिरते आहे. फक्त व्यक्तीकेंद्रीत विचार करणाऱ्या मिशनरी हे समजू शकणार नाहीत. मिशनरींनी जातीव्यवस्थेकडे त्यांच्या धर्मांतराच्या योजनेतील मोठा अडसर म्हणून पाहिलं. तर काँग्रेसला जातीव्यवस्था हिंदू समाजातील मेख वाटतेय. ब्रिटिशांप्रमाणेच काँग्रेसनंही धोरण ठेवलं असून त्यांना लोकसभेच्या जागांची जातीवर आधारित विभागणी करायची आहे. त्यातूनच देशातही दुफळी निर्माण करायची आहे. त्यासाठीच ते जातीआधारित जनगणनेची मागणी करत आहेत”, असा थेट दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.

दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं अद्याप जातीआधारीत जनगणनेला थेट विरोध दर्शवलेला नसल्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रीय राजकारणात व देशातील दोन प्रमुख पक्ष भाजपा व काँग्रेसमध्ये होणार्‍या राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.