RSS-BJP Relation: लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामध्ये विसंवाद असल्याचे दिसून आले. निवडणुकीआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघाबाबत केलेले विधान आणि निकालानंतर संघाशी संबंधित मुखपत्रातून व्यक्त केली गेलेली प्रतिक्रिया यावरून संघ परिवारात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र दिसले होते. मात्र, लोकसभेच्या निकालातून शहाणपण घेत दोन्ही संघटनांनी एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत काम सुरू केले. त्याचे परिणाम हरियाणा निवडणुकीत दिसून आले. यावेळी हरियाणात भाजपाचा पराभव होणार, असा अंदाज व्यक्त केला गेला असताना संघाच्या मदतीने भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हाच कित्ता गिरविला जाण्याची शक्यता आहे. याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसने सविस्तर लेख प्रकाशित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागच्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांनीही भाजपा आणि संघ यांच्यात सर्व काही सुरळीत असल्याचे निक्षून सांगितले. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही संघाने पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. भाजपा आता स्वयंभू झाला असून, त्याला संघाची गरज नाही, असे नड्डा म्हणाले होते. याबाबत प्रश्न विचारला असता होसबाळे म्हणाले की, नड्डा यांच्या विधानामागची भावना आम्हाला समजली आहे आणि त्यावरून आमच्यात तणावाचे कोणतेही कारण नाही.

दरम्यान, वाद टाळण्यासाठी भाजपाचे नेते मात्र दोन्ही संघटनांमधील कार्यकर्त्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचे सांगत आले आहेत. लोकसभेत बसलेला फटका हा दोन्ही संघटनांच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने लेखात नमूद केले की, भाजपावर मोदी-शाहांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर पक्षाचा संघाशी समन्वय कमी झाला होता. मात्र, दोन्ही संघटनांचे हातात हात घेऊन चालणे किती महत्त्वाचे आहे? ही बाब हरियाणामधील विजय सिद्ध करणारा ठरला. तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संघटनांमध्ये कधीही वैचारिक संघर्ष नव्हता; फक्त कार्यात्मक अडचणी होत्या. त्याचा आता साक्षमोक्ष लावण्यात आला आहे.

हे वाचा >> “आर. आर. पाटलांनी माझा केसानं गळा कापला, फडणवीसांनी मला…”, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा

भाजपाचे पुढचे अध्यक्ष संघाच्या जवळचे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या योजनांवर देखरेख ठेवण्याचे काम केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे देण्यात आले आहे. चौहान हे संघाच्या जवळचे नेते मानले जातात आणि त्यामुळेच त्यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे पुढचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

हरियाणात यश कसे मिळाले?

छोट्या स्तरावर नेटवर्किंग, छोट्या समाजांपर्यंत पोहोचणे आणि छोट्या छोट्या बैठकांमधून काँग्रेसप्रणीत आघाडीच्या दाव्यांना प्रत्युत्तर आदींद्वारे संघाने त्यांच्या नेहमीच्या शैलीने हरियाणामध्ये यश मिळविले. तसेच विरोधी पक्ष काँग्रेस गाफील राहिलेला असताना संघाने जाटेतर ओबीसी मतांचे एकत्रीकरण केले. तसेच अनुसूचित जातीच्या एका मोठ्या मतपेटीलाही संघाने भाजपाकडे वळविले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निकालावरून असे दिसून आले होते की, हरियाणातील ९० पैकी ४४ विधानसभा मतदारसंघांत भाजपाला आघाडी मिळाली होती; परंतु गैरव्यवस्थापनामुळे ते पिछाडीवर होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास नडला असल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले. उमेदवार निवडीबाबत भाजपामध्येच नाराजीचे वातावरण होते. तसेच १० वर्षांच्या सत्तेमुळे भाजपा नेते जनतेपासून तुटले होते. तसेच अनेक जण लोकसभेला मतदान करण्यासाठी बाहेर पडले नाहीत, याचाही परिणाम निकालावर झाल्याचे दिसून आले.

हरियाणाचा कित्ता महाराष्ट्रात गिरवणार?

हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसीमधील जातींची एकजूट आणि अनुसूचित जाती व जमातींना एकत्र करून महाविकास आघाडीला तोंड देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मविआने मराठा आणि मुस्लीम मतदारांना एकत्र केल्यामुळे भाजपा ओबीसी आणि दलितांना एकत्र करण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातींमधील महार जातीचा किंवा बौद्ध समाजाचा काँग्रेसला पाठिंबा राहिला आहे; तर मातंग समाज हा संघामुळे भाजपाला पाठिंबा देतो.

अनुसूचित जातींच्या राखीव कोट्याचे उपवर्गीकरण करण्याचा विषय संघाने काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने त्यावर समिती स्थापन केली. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यामुळे हरियाणात भाजपाला मदत झाल्याचे मानले जाते. संघामधील सूत्रांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “विरोधकांनी भाजपाच्या ४०० पार घोषणेचा हवाला लोकसभेत दिला. आता आम्ही राहुल गांधींनी अमेरिकेच्या दौऱ्यात आरक्षण संपविण्याची जी घोषणा केली, त्याबाबत लोकांमध्ये जाऊन जागृती करू. संघाची ही पारंपरिक प्रचाराची पद्धत याही वेळेस उपयोगी पडेल.”

भाजपामधील एका नेत्याने सांगितले की,ऑगस्ट महिन्यात म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर तीनच महिन्यांनी संघाने रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावरून ‘संविधान वाचवा’ मोहीम सुरू केली. ही जागर यात्रा सप्टेंबरच्या अखेरीस दादरमधील चैत्यभूमी येथे समाप्त झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळे येथून अस्पृश्य समाजाला न्याय देण्यासाठी सामाजिक समतेचा लढा सुरू केला होता.

झारखंडमध्ये संघाची मदत कशी?

महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. संघाने झारखंड राज्यात आदिवासींमध्ये काम केले आहे. त्यामुळे भाजपाला भक्कम पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तविली जाते. आदिवासीबहुल भागात संघाने आपल्या स्वयंसेवकांना पसरविले आहे. झारखंडमधल्या आदिवासीबहुल भागातील लोकसभेच्या जागा गमावल्यानंतर आता अधिक दक्षता घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss and bjp close the distance via haryana onward now to maharashtra jharkhand assembly election kvg