Who Was Dara Shikoh : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनांनी केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या उपराजधानीत तणावाचं वातावरण निर्माण झालं. यादरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुघल सम्राट आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यातील फरक समजावून सांगितला. इतकंच नाही तर होसबळे यांनी दारा शिकोह याची प्रशंसाही केली. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यात व्यस्त आहे, असा आरोप भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत केला. आरएसएसकडून दारा शिकोहची प्रशंसा : दारा शिकोह आणि इतर मुघल शासकांमधील फरक समजवून सांगण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वी २०२० मध्ये, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं दिल्लीतील हुमायूनच्या कबर संकुलात असलेल्या दारा कबरीचा शोध घेण्यासाठी एका पॅनेलची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश उत्तराधिकाराच्या युद्धात आपल्या भावाकडून पराभूत झालेल्या दारा शिकोह याला प्रकाशझोतात आणण्याचा होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंजेबाचे वर्णन मध्ययुगीन अत्याचारी राजा म्हणून केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपा सरकारनं एका वर्षाच्या आत नवी दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं ठेवलं. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये नवी दिल्लीतील औरंगजेब लेनचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम लेन असं ठेवण्यात आलं. एकीकडे औरंगजेबाच्या स्मृती पुसून टाकण्यासाठी आवाज उठत असताना दुसरीकडे दारा शिकोहच्या आठवणी ताज्या केल्या जात आहेत. २०१९ मध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक कृष्ण गोखले यांनी दारा शिकोह याचा उल्लेख खरा हिंदुस्थानी असा केला होता. भारतीय परंपरांवर प्रेम करणारा आणि उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर करणारा दारा शिकोह सच्चा मुस्लीम होता, असं ते म्हणाले होते.
आणखी वाचा : Maharashtra Politics : कुणाल कामराचा ‘तो’ शब्द शिंदे गटाच्या जिव्हारी का लागला?
आरएसएसची नेमकी भूमिका काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असा दावा आहे की, भारतात राहणाऱ्या बऱ्याच मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते. होसबळे यांनीही अलीकडील आरएसएसच्या वार्षिक बैठकीत याच दाव्याचा पुनरुच्चार केला. सप्टेंबर २०१८ मध्ये मुस्लिमांबद्दलच्या भूमिकेवरील प्रश्नाला उत्तर देताना आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कुठली भूमिका चुकीची आहे हे अल्पसंख्याक समुदायानं सांगावं. हिंदूंच्या पाठिशी संघ नेहमीच उभा राहत आला आहे आणि यापुढेही राहील. आम्ही हे तुम्हाला बहिष्कृत करण्यासाठी नाही तर तुम्ही आमच्यापैकी एक आहात हे अधोरेखित करण्यासाठी म्हणत आहोत.”
१९८० च्या दशकात दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुण्यात सावरकरांवर खणखणीत भाषण केलं होतं. या भाषणात त्यांनी भारतातील वाढत्या धर्मांतरांबाबत खंत व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी इंडोनेशियासारख्या देशांचं उदाहरणही दिलं होतं. तेथील मुस्लीम लोक त्यांचा धर्म विसरले नाहीत, मात्र त्यांची उपासना करण्याची पद्धत बदलली आहे, असं वाजपेयी म्हणाले होते. भारतातील मुस्लिमांनीही प्रेरणा म्हणून आपल्या प्राचीन संस्कृतीकडं पाहावं, असं आवाहनही त्यांनी आपल्या भाषणातून केलं होतं.
अब्दुल कलामांचा आरएसएसला आदर
“भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक मुस्लिमांचा द्वेष करत नाही. जे मुस्लीम हिंदू धर्माचा आदर करतात आणि त्यांच्या परंपरा मानतात, त्यांच्याबद्दल संघाला सहानुभूती आहे. मात्र, हिंदूविरोधी भूमिका घेणाऱ्या मुस्लिमांना संघ नेहमीच विरोध करतो”, असं आरएसएसच्या एका नेत्यानं सांगितलं. “भगवान कृष्णाची पूजा करणारे रसखान आणि रहीम आणि शिकोहसारख्या मुस्लिमांची औरंगजेबाशी तुलना होऊच शकत नाही. औरंगजेबाने हिंदूंवर जझिया (मुस्लिमेतरांवर कर) लादला, मंदिरे पाडली आणि हिंदूंचा अमानुष छळ केला. महमूद गझनवी आणि बाबर या दोन्ही आक्रमणकर्त्यांनीही अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली, त्यांच्यापेक्षा शिकोह खूपच वेगळा आहे”, असंही ते म्हणाले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार कौतुक केलं जातं. २००२ मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपा सत्तेत असताना कलाम यांची राष्ट्रपतिपदी निवड करण्यात आली होती. अगदी महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जहां-ए-खुसरोच्या शताब्दी कार्यक्रमात इस्लाममधील सुफी परंपरेचे कौतुक केलं होतं. अमीर खुसरो यांना हिंदुस्थानवर खूप प्रेम होतं, असं पंतप्रधान म्हणाले होते. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाही गेल्या तीन वर्षांपासून सुफी परंपरेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
दारा शिकोह कोण होता?
दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ आणि शाहजहानचा आवडता मुलगा होता. तो आजोबा अकबरसारखा विद्वान होता. इतिहासकार जदू नाथ सरकार त्यांच्या ‘औरंगजेबाचा इतिहास’ या पुस्तकात लिहितात की, “दारा शिकोहने त्यांचे पणजोबा अकबर यांच्या पावलावर पाऊल ठेवले होते. त्यानी मुस्लीम सुफींचे लेखन आणि हिंदू वेदांत यांचा अभ्यास केला. दारा शिकोह यानी हिंदू पंडितांच्या गटाच्या मदतीनं उपनिषदांची पर्शियन आवृत्ती तयार केली. तो सर्व धर्माचा सम्मान करीत होता. इस्लाम धर्माशिवाय त्याला हिंदू धर्माचाही प्रचंड आदर होता. तो ब्राह्मण, योगी आणि तपस्वींच्या सहवासात रहात होता. दारा शिकोह याने वेदांना दैवी ग्रंथ मानले आणि देवी-देवतांची पूजा केली. दुसरीकडे, रमजानमध्ये नमाज आणि उपवास करूनही औरंगजेब पाखंडी झाला, त्याने हिंदू मंदिरं पाडली आणि अनेकांवर अत्याचार केला.”
दारा शिकोहबाबत इतिहासकार काय म्हणतात?
जवाहरलाल नेहरू त्यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात लिहितात, “औरंगजेब हा अकबराच्या धोरणांपासून खूप दूर गेलेला होता. तो एक कट्टर मुस्लीम शासक आणि कठोर नीतिवादी होता. त्याला कला आणि साहित्याच्या बाबतीत अजिबात प्रेम नव्हते. औरंगजेबाने हिंदूंवर जुना घृणास्पद जझिया कर लादला आणि त्यांची अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. त्याच्या काळात जनतेला मोठे हाल सहन करावे लागले.”
इतिहासकार सतीश चंद्र हे आपल्या मध्ययुगीन भारत, भाग दोन या पुस्तकात लिहितात, “दारा शिकोह आणि औरंगजेब यांच्या व्यक्तिमत्त्वात तसेच दृष्टिकोनात खूप फरक होता. दारा शिकोह नेहमीच उदारमतवादी सुफी आणि संतांचा आदर करीत होता. त्याला एकेश्वरवादाच्या सिद्धांतात खोल रस होता. त्याने करार आणि वेदांचा अभ्यास केला. वेद कुराणला पूरक आहेत, याची त्याला खात्री होती. दुसरीकडे, औरंगजेब कुराण आणि पवित्र साहित्याच्या अभ्यासात समर्पित होता. विविध धार्मिक विधींचे पालन तो काटेकोरपणे करत होता. दारा शिकोह औरंगजेबाला ढोंगी म्हणत आणि औरंगजेब दाराला अधर्मी म्हणत…”
हेही वाचा : BJP MLAs suspended : भाजपाच्या १८ आमदारांचं निलंबन का करण्यात आलं? काय आहेत नियम? कायदा काय सांगतो?
औरंगजेबानं दारा शिकोहला का मारलं?
शिकोह याला त्यांच्या वडिलांनी आपला उत्तराधिकारी म्हणून निवडले होते. परंतु, उत्तराधिकाराच्या महत्त्वाच्या लढाईत त्याचा धाकटा भाऊ औरंगजेबाने त्याला पराभूत केलं. राजस्थानमधील अजमेरजवळील देवराईच्या लढाईत पराभव झाल्यानंतर मार्च १६५९ मध्ये शिकोह अफगाणिस्तानाला निघून गेला, परंतु तेथील अफगाण सरदार मलिकने त्याला पकडले आणि औरंगजेबाकडे हजर केले, ज्याने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. सतीश चंद्र लिहितात, शिकोह हा मुस्लीम धर्माविरोधी आहे, त्याच्यामुळे पवित्र इस्लाम धर्म संकटात येऊन मुघल राजवटीचा नाश होईल, असं कट्टरपंथीयांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी औरंगजेबाकडे दारा शिकोहला मृत्युदंड देण्याची मागणी केली.
औरंगजेब हा क्रूर शासक होता का?
सतीश चंद्र असेही म्हणतात की, औरंगजेब हा कठोर मुस्लीम शासक होता. त्याने अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली आणि जझिया लादला, परंतु त्याचे धार्मिक धोरण केवळ त्याच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धेवर आधारित होते, असं म्हणणं चुकीचं ठरेल. खरं तर त्याला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागले. औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली असली तरी त्याने काही मंदिरांना अनुदानही दिलं होतं. इतिहासकार अतहर अली लिहितात, “औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात हिंदू श्रेष्ठींची संख्या वाढून एक तृतीयांश झाली होती. धर्मांध म्हणून औरंगजेबाचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आला आहे.” दरम्यान, अतहर अली यांनी केलेला हा युक्तिवाद इतिहासकार ऑड्रे ट्रश्के यांनीही पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd