नागपूर : देशात आपल्या स्वार्थासाठी तसेच राजकीय प्रतिस्पर्धाला पराभूत करण्यासाठी अनिष्ट शक्तींसोबत आघाडी केली जात आहे. असे करणे हा अविवेकी आहे, अशा शब्दांत कोणत्याही राजकीय पक्षांचे नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विरोधी पक्षातील २६ पक्षाच्या ‘इंडिया ’ आघाडीवर टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन होते. सुरूवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. त्यानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी २०२४ मध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक, अयोध्यातील राम मंदिर, मणिपूरमधील हिंसाचार यावर भाष्य केले. डॉ. भागवत म्हणाले, देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी आघाडी करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आहे. अशा वेळी अशा अनिष्ट शक्तींना समाज किंवा देशाचे विभाजन करून पाहणाऱ्या अंतर्गंत किंवा बाहेरील शक्तींची सहज साथ मिळते.

हेही वाचा… मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांची कसोटी

डॉ. भागवत यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होत आहे. तेथे सर्वांना येणे शक्य नाही. म्हणून प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या गावातच वेगवेगळ्या मंदिरात कार्यक्रम आयोजित करावे .

काही विनाशकारी शक्ती स्वत:ला सांस्कृतिक मार्क्सवादी म्हणतात. त्यांनी मार्क्सला १९२० मध्ये सोडले. त्यांचा जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार व संयम यास विरोध आहे. काही मुठभर लोकांच्या संपूर्ण मानवजातीवर प्रभाव असावा म्हणून ते अराजकतेचा पुरस्कार आणि प्रचार-प्रसार करतात, असे भागवत म्हणाले.

हेही वाचा… अकोल्यात काँग्रेस अडकली वादात

मणिपूर हिंसाचाराबाबत ते म्हणाले, हा हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे. दशकभर शांत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का? असा प्रश्नही त्यांनी केला.

२०२४ च्या निवडणुकीत भावना भडकवल्या जातील

आगामी २०२४ वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान लोकांच्या भावना भडकावण्याचे मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. प्रत्येकाने मतदान करावे. त्यासाठी स्वयंसेवक प्रयत्न करतील, असेही डॉ. भागवत म्हणाले.

हेही वाचा… कोणाचे ऐकावे, अजितदादा की चंद्रकांतदादांचे ? अधिकारी बुचकाळ्यात

शंकर महादेवन यांनी गायले सरस्वती श्लोक

गायक शंकर महादेवन यांनी सरस्वती श्लोकाने भाषणाला सुरुवात केली. अखंड भारताचा विचार, येथील परंपरा, संस्कृती वाचवण्यात मोठे योगदान आहे, असे सांगून भारत देश जर गीत असेलतर संघाचे स्वयंसेवक सरगम आहे, असे गौरद्वोगार शंकर महादेवन यांनी काढले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंकर महादेवन यांच्या पत्नी संगिता महादेव, अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat criticise opposition parties on political interest print politis news asj