लोकसभेतील बहुमत गमावून भाजपाने एनडीएतील घटक पक्षांच्या सहाय्याने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. या सरकारची भिस्त खासकरून टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीश कुमार यांच्यावर असणार आहे. रविवारी (९ जून) शपथविधी पार पडल्यानंतर मंगळवारी एनडीए सरकारमधील मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार हातात घेतला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा लवकरच लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचाही आढावा घेणार आहे; तसेच देशपातळीवर पक्षसंघटनेला पुन्हा तरतरी आणण्यासाठीचे कृती कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. या घडामोडींची सुरुवात सदस्य नोंदणी अभियानापासून सुरू होण्याची शक्यता असून नव्या अध्यक्षांच्या निवडीमध्ये त्याची सांगता होईल. पक्षाला नवा अध्यक्ष आधीच मिळेल की विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली या घडामोडी घडतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जे. पी. नड्डा यांनी नव्या मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्य खात्याचा कारभार आपल्या हातात घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “मणिपूरमधील वाद मिटवण्याला प्राथमिकता द्या”, मोहन भागवत यांचे विधान चर्चेत!

सरसंघचालकांच्या कानपिचक्या

पक्षाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या संसदीय मंडळाची बैठक लवकरच होणार असून त्यामध्ये याबाबतचे निर्णय घेतले जातील. एकीकडे हे सगळे सुरू असताना दुसरीकडे भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला दिलेल्या कानपिचक्या चर्चेचे कारण ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या प्रचारावरून त्यांनी एकप्रकारे सावधगिरीचा इशाराच भाजपाला दिला आहे. निवडणूक प्रचारात जो अतिरेक झाला त्यापासून दूर होत समस्यांवर चर्चा व्हायला हवी. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, अशी अपेक्षा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांनी ही टीका भाजपाच्या नेतृत्वावर केली आहे. “त्यांनी या प्रकारे सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य केले आहे, याचा अर्थ संघामध्ये आणि पक्षातील संवादामध्ये काहीतरी गडबड आहे, सगळंच आलबेल आहे, असे चित्र नाही. कारण सार्वजनिक ठिकाणी भागवत भाजपाच्या नेत्यांवर अशी टीका शक्यतो करत नाहीत.”

“त्यांनी मणिपूरबाबत केलेल्या वक्तव्यातून हे स्पष्ट होते की, तिथे जे काही घडते आहे वा ती परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली जात आहे, त्याबाबत संघ नाराज आहे. मात्र, याचा अर्थ संघ आणि भाजपामधील सगळाच संवाद संपुष्टात आलेला आहे, असेही नाही. मात्र, तो जसा असायला हवा, तसा नाही इतकंच”, असेही सूत्रांनी सांगितले. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोहन भागवत यांनी मणिपूरवरून आपली चिंता व्यक्त केली. “सगळीकडे विसंवाद निर्माण झाला आहे, हे काही बरोबर नाही. गेल्या एका वर्षापासून मणिपूर शांतता निर्माण होण्याची प्रतीक्षा करतो आहे. अशांततेच्या आगीत जळतो आहे. गेल्या दशकभरापासून मणिपूर शांत होता. जुने ‘गन कल्चर’ नष्ट झाले आहे असे वाटले, मात्र अचानक तिथे जो कलह निर्माण झाला वा निर्माण करण्यात आला, त्या आगीमध्ये मणिपूर अजूनही जळतो आहे. त्याच्याकडे कोण लक्ष देणार? त्याला प्राथमिकता देऊन त्यावर विचार करणे हे कर्तव्य आहे.” लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बहुमत मिळालेले नाही. भाजपाच्या काही नेत्यांचे असे म्हणणे आहे की, मोहन भागवत यांच्या वक्तव्याला निवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल नाराज आणि असंतुष्ट असलेल्या लोकांमधून सहमती मिळू शकते. “भागवतजी यांनी हे विधान केलेले असल्यामुळे भाजपा पक्षातले शीर्षस्थ नेतृत्व ते गांभीर्याने घेतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे”, असे आणखी एका भाजपा नेत्याने म्हटले.

हेही वाचा : “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

मातृसंघटनेत नाराजी?

उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपाचे चांगले वर्चस्व असूनही तिथे पक्षाला फटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्येही आपला वाढता प्रभाव टिकवून ठेवण्यात भाजपाला यश आलेले नाही. तिथेही पक्षाला फटका बसला आहे. सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना अनेक उमेदवारांबाबत संघाचा अभिप्राय भाजपाने गांभीर्याने घेतला नव्हता. मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत काय वाटते, असे एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला विचारले असता, “आम्ही त्यांच्या वक्तव्यांचा विचार करू” असे सांगण्यात आले.

सरकारमध्ये कोणताही मोठा बदल होणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी सोमवारी त्यांच्या खातेवाटपातून स्पष्ट केले. मात्र, पक्ष संघटनेमध्ये काही बदल घडल्यास नव्या राजकीय शक्यतांची ती सुरुवात असू शकते, असे काही सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचे अध्यक्ष अमित शाह सरकारमध्ये सामील झाल्यानंतर नड्डा यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. जानेवारी २०२० मध्ये त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. भाजपाला देशव्यापी नव्या सदस्य नोंदणीची मोहीम सुरू करण्यासाठी तसेच जिल्हा आणि राज्यपातळीवरील संघटनात्मक बांधणीमध्ये लक्ष घालण्यासाठी पक्षाचा अध्यक्ष म्हणून एका पूर्णवेळ नेत्याचीच गरज भासेल. सध्याच्या सरकारमध्ये पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आल्याने पक्षाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल, याबाबत अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. तरीही चर्चेत असलेल्या नावांमध्ये महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे; भाजपाचे ज्येष्ठ नेते ओम माथुर, के. लक्ष्मण, सुनील बन्सल आणि अनुराग ठाकूर यांचीही नावे चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat remarks on bjp manipur conflict vsh
First published on: 12-06-2024 at 10:59 IST