देवाची भक्ती करण्याचा, उपासना करण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. पण देव एकच आहे. आपण या एका मुद्द्यावरून भांडण करू नये, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. शुक्रवारी (१८ मार्च) उर्दू भाषेतील सामवेद ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक आणि पदाधिकारी, मुस्लीम धर्मगुरू उमेर इलयासी, जैन मुनी लोकेश, वेगवेगळ्या मुस्लीम संस्थांचे प्रतिनिधी, अभिनेता सुनील शेट्टी, मुकेश खन्ना, गजेंद्र चौहान, जया प्रदा आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा >> विश्लेषण : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाकडून पुतिन यांना अटक वॉरंट, पुढे काय होणार?
आपले मार्ग वेगवेगळे असू शकतात, मात्र…
“आज संपूर्ण जगात संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर उपाय काय आहे? प्रत्येकाने आपली विचार करण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. आपले मार्ग वेगवेगळे असू शकतात, मात्र आपले ध्येय एकच आहे, ही बाब आपण समजून घ्यायला हवी. निवडलेल्या मार्गांवर वाद घालत बसण्यापेक्षा आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायला हवे. हेच एकमेव सत्य असून भारताने जगाला हा संदेश द्यायला हवा,” असे मोहन भागवत म्हणाले.
हेही वाचा >> विश्लेषण : जागावाटपाचे कोडे अन् बावनकुळेंचे आकडे… भाजपचे विधानसभा निवडणुकीचे गणित काय?
प्रार्थनेच्या प्रत्येक पद्धतीचा आदर करायला हवा
“आपल्यात फूट पाडणाऱ्या शक्ती ओळखून त्यांच्यापासून आपण स्वत:चे रक्षण करायला हवे. वेदांच्या माध्यमातून आपण हे शिकले पाहिजे. प्रार्थना करण्याची प्रत्येक पद्धत योग्य आहे. तुम्ही ज्याची प्रार्थना करता तो देव परिपूर्ण आहे. तो सर्वांपेक्षा मोठा आहे, हे लक्षात ठेवायला हवे. प्रार्थनेच्या प्रत्येक पद्धतीचा आदर करायला हवा. लोक देवाची वेगवेगळ्या पद्धतींनी उपासना करतात. मात्र देव हा एकच आहे,” असेही मोहन भागत म्हणाले.