RSS Mohan Bhagwat on Hindu Society : हिंदू धर्मातील लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी भाषेत बोलू नये, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. धर्म हा हिंदूंचा आत्मा असून, प्रत्येकानं त्याचं वैयक्तिकरीत्या पालन करायला हवं, असंही ते म्हणाले. केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पंपा नदीच्या काठावर बुधवारी (५ फेब्रुवारी) हिंदू धार्मिक परिषदेचा भाग म्हणून हिंदू एकता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले, आरएसएस प्रमुख?

हिंदू एकता परिषदेत बोलताना आरएसएस प्रमुख म्हणाले, “एकजूट असलेला समाज भरभराटीला येतो; तर विखुरलेला समाज कोमेजून जातो. धर्म हा हिंदूंचा आत्मा असून, प्रत्येकाने त्याचं वैयक्तिकरीत्या पालन करायला हवं. हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबानं किमान आठवड्यातून एकदा एकत्र येऊन प्रार्थना करावी आणि त्यांची सध्याची जीवनशैली परंपरेनुसार आहे का यावर चर्चा करावी. आपण बोलत असलेली भाषा आणि आपले कपडे हिंदू परंपरेशी जुळतात का याचाही विचार करायला हवा.”

आणखी वाचा : Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?

पुढे बोलताना मोहन भागवत यांनी, “हिंदूंनी आपापल्या स्थानिक भागात फिरायला हवं आणि आपल्या बांधवांची भेट घेऊन, त्यांना मदत करायला हवी. त्याचबरोबर आपण इंग्रजी भाषेत बोलू नये आणि आपले स्थानिक खाद्यपदार्थच खायला हवेत. सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना हिंदू बांधवांनी पारंपरिक कपडे घातले पाहिजेत. पाश्चात्त्य पोशाख घालू नयेत”, असं आवाहनही केलं.

‘हिंदू धर्मात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही’

आरएसएस प्रमुख सध्या दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी केरळचे आध्यात्मिक नेते व समाजसुधारक श्री नारायण गुरू यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशनही केलं. यापूर्वी मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक उपक्रमांचा भाग म्हणून १६ ते २१ जानेवारीदरम्यान राज्याचा दौरा केला होता. “हिंदू समाजानं आपल्या अस्तित्वासाठी एकत्र यावं आणि एक समुदाय म्हणून स्वतःला मजबूत करायला हवं. हिंदू धर्मात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही, जात महत्त्वाची नाही आणि अस्पृश्यतेला स्थान नाही. सर्व हिंदू एकत्र आले, तर जगाचं कल्याण होईल. शक्तीचा वापर विनाकारण इतरांना हानी पोहोचवण्यासाठी करू नये”, असं आवाहनही आरएसएस प्रमुखांनी केलं.

मोहन भागवत म्हणाले, “जगभरात होणाऱ्या संघर्षाला धर्म कारणीभूत आहे. कारण- अनेक लोकांना असं वाटतं की, त्यांचा धर्म आणि श्रद्धा सर्वोच्च आहेत. परंतु, हिंदू धर्म वेगळा असून, तो सर्व धर्मांचा आदर करतो आणि एकात्मतेलाही प्राधान्य देतो. धर्माचं पालन नियमांनुसार केलं पाहिजे आणि नियमांच्या कक्षेत कोणत्याही प्रथा बसत नसतील, तर त्या रद्द केल्या पाहिजेत. जातीयवाद आणि अस्पृश्यता हे धर्म नाहीत, असं नारायण गुरू सांगत होते.”

चेरुकोलपुझा हिंदू संमेलन केरळ येथील हिंदू मठ महामंडळ या संस्थेतर्फे आयोजित केले जाते. १९१३ मध्ये समाजसुधारक चटंबी स्वामीकल यांनी अस्पृश्यतेविरोधात लढण्यासाठी याची स्थापना केली होती. स्वामीकल यांनी हिंदू धर्मातील पारंपरिक प्रथा, कर्मकांडीक प्रथा, महिला आणि मागासलेल्या समुदायांच्या सक्षमीकरणाची मागणी केली.

हेही वाचा : Maharashtra Politics : शिर्डीतल्या एकाच इमारतीत ७ हजार मतदार वाढले? काँग्रेसच्या आरोपात किती तथ्य?

यंदा या कार्यक्रमाला ११३ वर्षे होत असून, रविवारी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री रोशी ऑगस्टीन, पठाणमथिट्टाचे खासदार अँटो अँटोनी आणि केरळ विधानसभा विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन उपस्थित होते. हिंदुमठ महामंडळाचे उपाध्यक्ष, वकील के. हरिदास यांनी सांगितले की, या संघटनेसाठी मोहन भागवत यांचे संमेलनात उपस्थित राहणे हा अभिमानाचा विषय आहे.

‘समाजाने प्रयत्न केला तर देश महान होतो’

दरम्यान, २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी मोहन भागवत यांनी भिवंडीतील आपल्या भाषणात धर्माची व्याख्या सांगितली होती. “तुम्ही आनंदी असाल आणि घरात दुःख असेल तर तुम्ही आनंदी राहू शकत नाही. हीच व्याख्या गाव, शहर, राज्य यांनाही लागू होते. एक राज्य दुःखी असेल तर देश आनंदी राहू शकत नाही. आपल्याकडे लोक म्हणतात व्यक्तीला मोठं व्हायचं असेल तर स्वातंत्र्य हवं, समता हवी मात्र हे कधी घडेल जेव्हा बंधूभाव वाढेल. कुठलाही माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो बंधूभाव जपतो”, असंही मोहन भागवत म्हणाले होते.

“आपल्या राष्ट्राच्या ध्वजात जे धम्मचक्र आहे तो आपला धर्म आहे. ते चक्र सगळ्यांच्या समानतेचा, बंधूभावाचा संदेश देत आहे. सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा संदेश ते चक्र देतं. आपल्याला या गोष्टी लक्षातच ठेवावी लागेल. आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धम्मचक्र आहे. तो बंधुभाव, समानता, समरसतेचा संदेश देतो. सर्वांच्या समानतेचा, स्वातंत्र्यतेचा संदेश देतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच आपल्याला जीवनात राहायचे आहे. कारण एका-दुसऱ्यामुळे राष्ट्र मोठे होत नाही. पूर्ण समाजाला आपला देश मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करावे लागतात. देश मोठे झाल्यास आपली प्रतिष्ठा देखील मोठी होते”, असंही आरएसएस प्रमुख म्हणाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat says hindus should dress traditional eat local food not speak english sdp