RSS HQ दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय उभं राहिलं आहे. केशव कुंज असं या मुख्यालयाचं नाव आहे. पाच लाख स्क्वेअर फुटांच्या जागेत हे मुख्यालय उभारण्यात आलं आहे. १२ मजल्यांच्या तीन इमारती या मुख्यालयात आहेत. या मुख्यायलायची वैशिष्ट्ये काय आहेत आपण जाणून घेऊ. २०१६ मध्ये या इमारतीचं काम सुरु करण्यात आलं होतं. जे आता पूर्ण झालं आहे.
संघाच्या मुख्यालयाची वैशिष्ट्ये काय?
१५० कोटी रुपये खर्च करुन दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय केशवकुंज उभं राहिलं आहे. या केशवकुंज मुख्यालयात साधना, प्रेरणा आणि अर्चना अशा प्रत्येकी १२ मजल्यांच्या तीन इमारती आहेत. तसंच एक मोठं वाचनालय आहे. पाच खाटांचं रुग्णालय आहे. एवढंच नाही तर लॉनही आहे आणि हनुमान मंदिरही आहे. १३०० लोक बसू शकण्याची क्षमता असलेली तीन ऑडिटोरियम आहेत. तसंच २७० कार पार्क होऊ शकतील एवढं मोठं पार्किंगही आहे.
संघाच्या देणगीतून उभं राहिलं आहे मुख्यालय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे मुख्यालय संघाला मिळालेल्या देणगी निधीतून उभं राहिलं आहे. या मुख्यालयासाठी ७५ हजार लोकांनी देणग्या दिल्या आहेत. ज्यातले काही निधी हे ५ लाख रुपये माणशी असेही आहेत. गुजरातचे वास्तु विशारद अनुप दवे यांनी या संघाच्या मुख्यालयाचं डिझाईन केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील केशवकुंजच्या आधी अनुप दवे यांनी दिल्ली, गुजरात येथील अनेक इमारतींचं डिझाईन केलं आहे. केशव कुंज या ठिकाणी मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून शिफ्टिंग सुरु करण्यात आलं आहे. मागच्या वर्षी केशव कुंज येथील काही काम सुरु होतं. तरीही या ठिकाणी शिफ्टिंग सुरु करण्यात आलं. दिल्लीमध्ये जे संघ मुख्यालय आहे ते आता तिसरं मुख्यालय ठरतं आहे. याआधी नागपूर आणि मध्य प्रदेशात संघाची मुख्यालयं आहेत. संघातील एका पदाधिकाऱ्याने सांगितलं की आमचं पहिलं मुख्यालय १९३९ मध्ये बांधण्यात आलं.
केशवकुंजमध्ये रुग्णालय, कँटीन, वाचनालय या सुविधाही आहेत
केशवकुंजचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते बांधत असतानाच खोल्यांची रचना अशी करण्यात आली आहे जिथे भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिल. तसंच संघ मुख्यालयात जे तीन टॉवर आहेत त्यांवर सौर उर्जेसाठीचे पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर इमारतींमध्ये करण्यात आला आहे. केशव कुंज या संघ मुख्यालयात कँटीन आणि मेस यांचीही सुविधा आहे. एकाच वेळी शेकडोजण जेवण करु शकतील इतकं मोठं कँटीन उभारण्यात आलं आहे. तर साधना या इमारतीतल्या १० व्या मजल्यावर केशव पुस्तकालय हे वाचनालय सुरु करण्यात आलं आहे. ज्यांना रिसर्च करायचा आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र क्युबिकल्सही तयार करण्यात आले आहेत. तसंच २५ जण बसून वाचू शकतील अशी खास आसन व्यवस्थाही तयार करण्यात आली आहे. या मुख्यालयात पाच खाटांचं छोटं रुग्णालयही उभारण्यात आलं आहे. जर कुणी आजारी पडलं किंवा पटकन उपचार करण्याची वेळ आलीच तर त्या दृष्टीने हे रुग्णालय कामी येणार आहे.