लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील संबंध दुरावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे कान टोचल्यानंतर संघाशी संबंधित मासिकांनीही भाजपाच्या सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना पक्षावर बरीच बोचरी टीका केली आहे. संघाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये याआधीही भाजपाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यानंतर आता ‘विवेक’ या संघाशी संबंधित साप्ताहिकानेही भाजपाच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचे विश्लेषण करताना अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या युतीवर खापर फोडले आहे. त्याबरोबरच पक्ष, कार्यकर्ते आणि राज्यातील महायुती सरकारमध्ये सुसंवाद नसल्यामुळे हा निकाल पहायला मिळाला असल्याची टीकाही विवेक साप्ताहिकाने केली आहे. ‘कार्यकर्ता खचलेला नाही, तर संभ्रमात!’ असे या लेखाचे नाव आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून. राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपाच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा